नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल करत असताना गद्दार, चोर यांसह निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका करत असताना पैसे देऊन निकाल घेतल्याची टीका करण्यात आली होती. यावरूनच शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेच्या संदर्भात नुकतीच सुनावणी पार पडली असून यामध्ये पुढील सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना उपस्थित राहण्याचे समन्स दिले जाणार आहे.
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह सोशल मीडियावर केली जाणाऱ्या टीकेच्या संदर्भात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये उद्धव ठाकरेंना सोडून जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, त्यांच्यावर गद्दार, चोर, पन्नास खोके एकदम ओके यासह विविध प्रकारच्या संदर्भात टीका करण्यात आली होती. त्यात टिकेला थेट न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.





