कणकवलीत रंगपंचमीला हाणामारी, चौघांवर गुन्हा

88

 

कणकवली : कणकवली शहराची रंगपंचमी मंगळवारी खेळली जात असतानाच शहरातील बांधकरवाडी येथे रंगपंचमीनंतर हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी चौघा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद मनीष महेश सावंत (२२, रा. मधलीवाडी) यांनी दिली असून त्यानुसार कणकवली-बांधकरवाडी येथील प्रणय मर्गज, सुमीत राणे, रजत राणे, अनिकेत म्हाडेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल फिर्यादीनुसार, मनीष सावंत हा २१ मार्च या रंगपंचमीदिवशी सायं. ५.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या घराजवळ उभा होता. त्याचवेळी बांधकरवाडी येथील काही तरुण तेथे घोळका करून होते. मनीष याने या तरुणांना ‘आपणास घरी जायचे आहे, वाटेतून बाजूला व्हा’ असे सांगितले. यावरून वरील तरुणांनी मनीष याला ‘रस्ता तुझ्या बापाचा आहे का?’ असे विचारत त्याला मारहाण केली. शिविगाळ करीत मनीषच्या मानेवर दांड्याने मारहाण केली. यावेळी मनीषची आई व काकी हाणामारी सोडवायला आली असता त्यांनाही धक्काबुक्की केली तसेच घरात घुसून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार संशयितांवर भादंवि कलम ४५२, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार विनोद सुपल करीत आहेत.-