लांजा : शेतीपंपासाठीच्या विद्युत मीटरच्या मांडणीत फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी झापडे गावातील शांताराम भगवान इंदुलकर (ता.लांजा जि.रत्नागिरी) यांचेविरूध्द महावितरणने लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या वीजचोरी प्रकरणी 6 हजार 720 युनिटची आर्थिक मुल्याप्रमाणे 1 लक्ष 41 हजार रूपयांचे वीज वापर व दंडाचे देयक आकारण्यात आले आहे.
शांताराम भगवान इंदुलकर यांचे शेतात दि.19 जानेवारी 2023 रोजी पंचासमक्ष स्थळपाहणी केली असता, विद्युत मीटरच्या मांडणीत फेरफार करून वीजचोरी सुरू असल्याचे निदर्शनास आले. ग्राहकास दंडाचे वीजबिल दिले. ते विहीत मुदतीत भरले नसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या लांजा -1 शाखा कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता मनाली माळी , मुख्य तंत्रज्ञ अनिल चौधरी, वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन नागले, अनिल साबळे यांनी ही कारवाई केली.





