डेगवेत दुचाकींच्या अपघातात दोघे गंभीर जखमी….!

58

बांदा : डेगवे सोसायटी नजीक दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात डेगवेतील दोघेजण गंभीररीत्या जखमी झालेत. राजेश शांताराम सुतार (४२) व संजय सिताराम देसाई (६२) अशी त्यांची नावे आहेत. राजेश सुतार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळीत हलविण्यात आले आहेत. संजय देसाई यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश सुतार हे सोसायटीच्या दिशेने परतत असताना समोरुन सुसाट येणाऱ्या अज्ञात दुचाकीने त्यांना जोरदार ठोकर दिली. यात राजेश सुतार हे खाली कोसळले. ही धडक इतकी जोरदार होती की राजेश यांच्या दुचाकीचे चाक तुटून पडले. डेगवे सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई, भाजपचे तालुका उपाध्यक्ष मधुकर देसाई, सरपंच राजन देसाई यांनी स्थानिकांच्या सहकार्याने अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. राजेश सुतार हे स्थापेश्वर दशावतार मंडळात पखवाजवादक म्हणून कार्यरत आहेत. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने दाखल झाला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. अनघा बांद्रे यांनी सांगितले.