संजय राऊत यांच्या अवमानकारक वक्तव्यामुळे विधिमंडळातही गदारोळ…!

विधानसभा , मुंबई : विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर हक्क भंग दाखल करण्याची मागणी भाजपा च्या अतुल भातखळकर यांनी अध्यक्षांना दिले आहे. आशीष शेलार, अतुल भातखळकर यांनी यावर तीव्र भावना व्यक्त केल्या. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी असे कोणीही म्हणणे गैर आहे मात्र अशा वक्तव्याची खात्री करून घ्यावी असं मत व्यक्त केलं.

बीजेपी नेता आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली ते म्हणाले जे स्वतः चोर असतात त्यांना सर्वच चोर दिसत असतात. सध्या त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे त्यामुळे चित्रपट बघणे आणि बेताल वक्तव्य करणे हेच काम सध्या त्यांच्याकडे उरले आहे. संजय राऊत यांचं विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणे हा विधानसभेचा आणि सर्व सदस्यांचा अपमान आहे, असे ते पुढे म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनीही विधिमंडळ आदराचे स्थान आहे, त्यांचे म्हणणे तपासून पहा, दोन्ही बाजूने शब्दांचा वापर जपून केला पाहिजे असं सांगितलं. शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी राऊत यांच्या विधानाबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या, तातडीने हक्क भंग दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या सर्व भावना व्यक्त होत असल्याने प्रश्नोत्तराचा तास सुरू झालाच नाही. रवींद्र वायकर यांनी गोगावले यांच्या शब्दांवर आक्षेप घेतला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र सत्तारूढ बाजूने जोरदार घोषणाबाजी करत सदस्य जागा सोडून पुढे आले, कामकाज पुढे वारंवार तहकूब झाले.