बांदा : ग्रामीण भागात हुशार मुलांची संख्या मोठी आहे. आरोस पंचक्रोशी विद्या विकासमध्ये गुणवत्ता पूर्ण असे शिक्षण मिळत आहे. मुलांनी अभ्यासाबरोबर क्रीडा, चित्रकला, सामाजिक उपक्रमामध्येही प्राविण्य मिळवावे. प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे. जिल्हा परिषद शाळा प्रामुख्याने टिकल्या पाहिजेत. आपलं शिक्षण जिल्हा परिषद शाळेतूनच झाले. शाळा हा आपल्या जीवनातील पाया आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणातून स्वतःचे नाव लौकिक केल्यास शाळेची उन्नती निश्चित आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केले.
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोसच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्ष म्हणून घारे परब बोलत होत्या. व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक अन्वर खान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे महेंद्र पेडणेकर, संस्था उपाध्यक्ष बाळा परब, संचालक मिलिंद जोग, अर्जुन मुळीक, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, मुख्याध्यापक विद्याधर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. संस्था अध्यक्ष रोहिदास सावंत यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अर्चना घारे परब म्हणाल्या की, कोकणला शैक्षणिक गुणवत्तेचा वारसा लाभल्याने कोकण म्हणजे शैक्षणिक भूमी आहे आणि त्यात कायम मुली बाजी मारतात. कोकणच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कधीही हाक मारल्यास सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन घारे परब यांनी दिले.
आदर्श विद्यार्थी म्हणून यश दिनेश खोत, विद्यार्थिनी उज्वला उमेश रेडकर, आदर्श पालक मदन मुरकर, आदर्श शिक्षक लाडू सावंत यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक लाडू सावंत, समिधा मांजरेकर, देवयानी चव्हाण, श्रद्धा परब, शिक्षकेतर कर्मचारी तानाजी खोत, लक्ष्मण शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वरक यांनी केले. प्रास्ताविक विद्याधर देसाई यांनी तर आभार अनिल नाईक यांनी मानले.
भावी महिला आमदार…!
राष्ट्रवादीच्या अर्चना घारे परब यांचे दिवसेंदिवस वाढत असलेले सामाजिक, शैक्षणीक, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्य पाहत उपस्थितांनी त्यांचा भावी महिला आमदार म्हणून उल्लेख केला. त्यामुळे त्यांच्याकडून अधिक कार्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





