शिवसेना खा. संजय राऊत यांचे कणकवलीत होणार जल्लोषी स्वागत : सतीश सावंत

140

कणकवली : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खा. संजय राऊत हे आज दि. फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. आज सायंकाळी ५ वाजता कणकवली येथे अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये त्यांचे जोरदार जंगी स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याशी राऊत संवाद साधणार असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शिवसेनेच्या संघटनात्मक वाढीसाठी हा दौरा फायदेशीर ठरणार आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व सिंधुदुर्ग जिल्हा वासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते.

सतीश सावंत म्हणाले, इडी, सीबीआय चौकशा होऊ नये म्हणून इतर सर्वजण सैरभैर पळत होते. मात्र संजय राऊत यांनी ईडीचे आव्हान मोडून काढले. संजय राऊत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्यांचे जिल्ह्यात स्वागत आहे. शिवसेनेच्या पडत्या काळात संजय राऊत यांनी शिवसेना सावरण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांच्या रुपाने असलेला शिवसेनेचा धगधगता निखारा तेजोमय करण्याचे काम संजय राऊत यांनी केले. ज्वलंत विचार असलेले संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा त्यांच्या पाठीशी खंबीर उभा होता.

संजय राऊत यांनी ईडीच्या विरुद्ध ज्या प्रकारे लढाई केली. शिवसेनेसाठी झगडले, तुरुंगवास सोसला अशा लढवय्या नेत्याच्या स्वागतासाठी शिवसेना युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी, व जिल्हावासीयांनी कणकवलीत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सतीश सावंत यांनी केले.