युवकांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे आवश्यक | आर. जे. पवार यांचे प्रतिपादन

कणकवली : युवकांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे आवश्यक आहेत. आपल्यात नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी युवकांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहन कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे गोपुरी आश्रम येथे तीन दिवसीय निवासी युवा व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

त्यावेळी शिबिर्थींना मार्गदर्शन केले. या समारोप कार्यक्रमाला कणकवली तहसीलदार आर.जे. पवार, महिला पोलीस एपीआय बंगडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी, वैदिक गणित प्रशिक्षक रुपाली कदम, व्यापारी असो. कणकवली अध्यक्ष दीपक बेलवलकर, सुगंधा देवरुखकर, यारा फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वराज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला पोलीस एपीआय बंगडे यांनी युवकांनी आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी ओळखून काम करावे, असे आवाहन केले. पुढील भावी पिढी उद्योजकांची पिढी आहे. आपल्याला जे आवडतं तेच शिका. दुसऱ्यांच्या अपेक्षांच्या बोज्याखाली राहू नका, असे दीपक बेलवलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

तर नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी यांनी नेहरू युवा केंद्राची माहिती देत युवा शक्ती सकारात्मक दिशेने वळविण्यासाठी नेहरू युवा केंद्राची भूमिका आवश्यक असल्याचे सांगितले.

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ११ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या दरम्यान गोपुरी आश्रमात जिल्हास्तरीय नेतृत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात चाळीसहून अधिक शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता. या शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य याविषयी अभिनेते आणि व्हाईस आर्टिस्ट निलेश पवार यांनी मार्गदर्शन केले. कणकवली बार असो. उपाध्यक्ष ॲड. प्राजक्ता शिंदे यांनी 376, 354 कायद्यांचा उपयोग-दुरुपयोग याविषयी माहिती देऊन युवकांना त्यांच्या अधिकारांविषयी मार्गदर्शन केले. लिंग समानता या सत्रात आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त प्रा. शिक्षिका आणि कवयित्री सरिता पवार यांनी तरुणांना माणुसपणाचा नवा दृष्टिकोन दिला.

युवा मंडळ स्थापना व सामाजिक विकास याविषयी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी माहिती दिली. संतोष घाडी यांनी सायबर क्राईम विषयी सविस्तर माहिती देऊन सोशल मीडियावर कार्यरत असताना कोणती काळजी घ्यावी, त्याविषयी सांगितले. तर युवकांची मानसिक स्थिती यावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मंजिरी घेवरी यांनी मार्गदर्शन केले. व्यवसाय सल्लागार तथा एमसीईडी चे जिल्हा प्रशिक्षक तुकाराम दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाच्या संधी आणि सरकारी योजना याविषयी मार्गदर्शन केले. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आयोजित खास सत्रात रुपाली कदम यांनी मैत्री, प्रेम, आकर्षण याविषयी युवकांच्या मनातील संकल्पना स्पष्ट करून त्यांच्याशी सुसंवाद साधला.

संविधान संवादक सुजय जाधव यांनी शिबिरार्थींना संविधानाची वेगळ्या शैलीने ओळख करून दिली. अंनिसचे मार्गदर्शक अनिल चव्हाण यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. सहदेव पाटकर यांनी प्रात्यक्षिकांद्वारे नेतृत्त्व विकास विषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर यांनी अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रविकासात युवकांचा सहभाग कसा असावा, याविषयी मार्गदर्शन केले. शिबिराच्या निमित्ताने युवकांमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चित्रकार, स्टोन आर्टिस्ट पूजा चव्हाण यांच्या चित्रांचे तसेच मनीष कलिंगण यांच्या पेन्सिल आर्टचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांना यारा फाउंडेशनमार्फत झाडाचे रोप देऊन वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शिबीर यशस्वी होण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे कणकवली तालुका समन्वयक अक्षय मोडक, देवगड तालुका समन्वयक सुजय जाधव, यारा फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वराज सावंत, उपाध्यक्ष समीर परब, सदस्य श्रेयश शिंदे, सहदेव पाटकर, विशाल गुरव, निलम राणे, विल्सन फर्नांडिस, प्रथमेश पेडणेकर, शुभ्रा देवलकर, सौरभ तळवडेकर, श्रद्धा चव्हाण, श्रीहर्षा टेंगशे, विक्रांत सामंत, कांचन खानोलकर, राहुल मेस्त्री यारा फाउंडेशनचे प्रशिक्षक गार्गी कसालकर, रश्मी दाभोळकर, गोपुरी आश्रमाचे बाबू राणे, अमोल सावंत आदींनी परिश्रम घेतले.