सावडाव शालेय मुलांच्या अपहरण प्रकरणी तपासाची चक्रे गतिमान करा : नितेश राणे

133

कणकवली : तालुक्यातील सावडाव येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्याची घटना आम. नितेश राणे यांच्या निदर्शनास येताच आम. नितेश राणे यांनी सोमवारी रात्री उशिरा सावडाव मध्ये भेट देत या विद्यार्थ्यांच्या पालकांशी व ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच ग्रामस्थांना धीर देखील दिला. यासंदर्भात पोलिसात अधिकाऱ्यांशी आम. नितेश राणे यांनी चर्चा करून तातडीने तपासाची चक्रे गतीने फिरवा अशा सूचना दिल्या. यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. भाग यांच्यासह पोलिस अधिकारी देखील उपस्थित होते.

दरम्यान बोलताना, आम. नितेश राणे यांनी सांगितले की, पोलीस यंत्रणा, एलसीबी पथकाच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तरीही पोलीस यंत्रणा या प्रकरणाच्या अगदी मुळापर्यंत जाऊन या प्रकरणाचा तपास करणार आहे. तसेच या प्रकरणातील सूत्रधार कोण, त्यासंबंधी माहिती कोणी दिली किंवा कोण देतय तसेच सावडाव या ठिकाणी असलेली टॉवर लोकेशन, कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून तपास केला जाईल. पोलिसांच्या हाती काही गोष्टी लागल्या आहेत. हा प्रकार कोणी ? का ? आणि कशासाठी केला ? तसेच प्रकार उघडकीस आल्यानंतर अपहरणकर्ते कुठे पळून गेले याची माहिती लवकरच समोर येईल.

ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये : आम. नितेश राणे

सावडाव येथे भेट दिल्यावर आम. नितेश राणे यांनी जिल्हावासीयांना याप्रकरणी धीर दिलाय. पोलीस यंत्रणा योग्य पद्धतीने तपास करत आहे. पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी सरकार म्हणून तसेच गृहखाते म्हणून आम्ही पुढचे पाऊल उचलू असा धीर देखील आम. नितेश राणे यांनी सावडाव ग्रामस्थांना तसेच जिल्हावासीयांना दिला आहे.

यावेळी भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगावकर, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख राजु हिर्लेकर, भाजपा कणकवली कार्यकारणी सदस्य संदीप सावंत, वागदे सरपंच संदीप रमाकांत सावंत, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, जानवली ग्रामपंचायत सदस्य नितीन राणे, प्रशांत राणे, महेश मेस्त्री, सावडाव सरपंच सौ वारंग, सावडाव उपसरपंच दत्ता काटे आदी उपस्थित होते.