देवगड : प्रतिनिधी
मोर्वे येथे बंद घरे फोडण्याचे सत्र सुरूच ; ८ हजार रुपयांची रोकड केली लंपास
देवगड तालुक्यातील मोर्वे येथे बंद घरे फोडण्याचे सत्र सुरूच असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य केली असून मोर्वे मधलीवाडी येथील बंद घराचे कुलूप कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील ८ हजार रूपये चोरून नेले.ही घटना २१ जुन २०२५ ते १४ जुलै २०२५ या कालावधीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मोर्वे मधलीवाडी येथील सुबोध यशवंत ढोके(६१) हे मुंबईमध्ये पोलिस सेवेत होते.सध्या सेवानिवृत्त असून गावी येथे येवून जावून राहत होते.जुन महिन्यात ते गावी आले होते.२१ जुन रोजी ते गावाहून मुंबईला गेले यामुळे त्यांचे घर बंद होते.
सध्या मोर्वे येथे चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य केली असून दोन बंद घरांची यापुर्वी कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली होती. गावात चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे ढोके यांनी पोलिस पाटील संदीप हिंदळेकर यांना आपल्या घरी जावून बघण्यास सांगीतले.
पोलिस पाटील हिंदळेकर यांनी त्यांची घरी जावून पाहिल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप, कडी कोयंडा कुठल्यातरी हत्याराने तोडून चोरी केल्याचे निदर्शनास आले.त्यांनी घरमालक ढोके यांना तात्काळ फोन करून घडलेली घटना सांगीतली.त्यानंतर ढोके हे मुंबईहून घरी आले व पाहिले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून चोरट्यांनी घरातील खोलीत असलेल्या सुटकेसमध्ये ठेवलेली ८ हजार रूपये रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले.याबाबत त्यांनी देवगड पोलिस स्थानकात फिर्याद दिली.पोलिसांनी चोरटयाविरूध्द भारतीय न्याय संहीता ३३१(३), ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस उपनिरिक्षक महेश देसाई करीत आहेत.





