कुडाळ (प्रतिनिधी)
कोकण रेल्वेच्या सीएसआर फंडातून मांडकुली हायस्कूलला शैक्षणिक साहित्य प्रदान !
‘विज्ञानाचे सिद्धांत प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी तसेच वैज्ञानिक संकल्पना, विज्ञानाचे शिक्षण प्रभावीपणे आणि रंजक पद्धतीने घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी मिनी सायन्स लॅबचा उपयोग करावा व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे आपले ज्ञान दृढ करावे’ असे प्रतिपादन कोकण रेल्वे (रत्नागिरी)चे रिजनल अधिकारी महेश साखळकर यांनी मांडकुली हायस्कूल मधील कार्यक्रमात केले.
मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी संचलित प. पूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडे (ता.कुडाळ) या विद्यालयाला कोकण रेल्वे रत्नागिरीच्या सीएसआर फंडातून दिलेल्या मिनी सायन्स लॅब उद्घाटन तसेच विद्यार्थी व महिला पालक यांना दिलेल्या विविध साहित्य प्रदान कार्यक्रमात श्री.साखळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोकण रेल्वे (कणकवली)चे अधिकारी पंकज कांबळे, रणजीत केसरी, एरिया सुपरवायझर विकास सामंत, निलेश वाडकर, संस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन परब, कार्याध्यक्ष वामन गावडे, सचिव अंकुश जाधव, खजिनदार देवदत्त चुबे, सहखजिनदार सौ.करिष्मा भोई, संचालक मोहन भोई, तातू मुळीक, निलेश सामंत, केशव पेडणेकर, मांडकुली सरपंच सौ. गौतमी कासकर, केरवडे सरपंच सौ. श्रीया ठाकूर, मुख्याध्यापक सुरेंद्र खोत आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर कोकण रेल्वे रत्नागिरीच्या सीएसआर फंडातून दिलेल्या मिनी सायन्स लॅबचे उद्घाटन श्री. साखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयाला एक संगणक व प्रिंटर, गरजू विद्यार्थिनींना 10 सायकली, ग्रंथालयासाठी सुमारे 10 हजार रुपये किंमतीची पुस्तके, 55 गरजू महिला पालकांसाठी प्रत्येकी 1000 रु.चे गृहोपयोगी साहित्य किट व सर्व विद्यार्थिनीना आरोग्य विषयक किट्सचे वितरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. नागवेकर हॉस्पिटल (कणकवली)च्या अधिपरिचारीका श्रीमती उबाळे व श्रीमती ठाकूर यांनी मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन करून कोकण रेल्वेतर्फे दिलेल्या हायजेनिक किट्सचे वाटप केले. संस्था व विद्यालयातील मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. निधी देण्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे रिजनल रेल्वे मॅनेजर शैलेश दामोदर बापट यांचा देखील सत्कार केरवडे सरपंच सौ. श्रीया ठाकूर यांच्या हस्ते रेल्वे अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ज्यांच्या प्रयत्नातून या निधीसाठी रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक सहाय्य मिळाले ते विकास सामंत यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र खोत यांनी सर्वांचे स्वागत करून शाळेची प्रगती व गुणवत्तापूर्ण निकाल याबद्दल आपले मत व्यक्त केले. पाहुण्यांची ओळख व परिचय विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गिरीश सरवटे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गोवेकर यांनी तर उपस्थित सर्वांचे आभार संस्था सचिव अंकुश जाधव यांनी मानले.





