बांद्यात कै.गाड सरांचा संगीत वर्ग पुन्हा सुरु ; श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्गाचा नव्याने आरंभ

20

 

बांदा (प्रतिनीधी)

बांद्यात कै.गाड सरांचा संगीत वर्ग पुन्हा सुरु ; श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्गाचा नव्याने आरंभ

बांदा शहराला भजनाची मोठी परंपरा आहे. गुरुवर्य कै. दिगंबर गाड सरांनी श्री बांदेश्वर संगीत कला वर्गाच्या माध्यमातून अनेक युवा कलाकार घडवून ही परंपरा पुढे नेण्याचे काम केले. गाड सरांच्या पश्चात पुन्हा नव्या दमाने तोच संगीत वर्ग सुरू करून शिष्यवर्गाने गुरूंचा हा वसा खऱ्या अर्थाने जपला आहे, असे गौरवोद्गार माऊली एकता कला क्रीडा मंडळ मोपाचे अध्यक्ष सत्यवान नाईक यांनी बांदा येथे काढले.

कै. दिगंबर गाड यांनी स्थापित केलेल्या श्री बांदेश्वर संगीत वर्गाचे दुसऱ्या पर्वात थाटात उद् घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन, भाऊ मिशाळ, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, खजिनदार मंगलदास साळगांवकर, पेडणे सहकारी संस्थेचे संचालक उमेश गाड,श्री इस्वटी संगीत विद्यालय पाडलोसचे पखवाज विशारद गुरू अमेय गावडे,श्री बांदेश्वर संगीत वर्गाचे अध्यक्ष सीताराम गावडे, संगीत अलंकार गुरुदास गांवकर, अजित गाड, क्रांती मोपकर उपस्थित होते.हा वर्ग श्री विठ्ठल मंदिराच्या माडीवर दर शनिवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरु राहणार आहे.

उमेश गाड म्हणाले, पेडणे तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाते कायम दृढ राहिले आहे. गोवा मुक्ती लढ्यात बांदावासियांचे योगदान खूप मोठे आहे. कै. दिगंबर गाड हे गोव्याचे संगीत रत्न होते. गोव्यासह बांदा दशक्रोशीत त्यांनी शेकडो शिष्य घडविले. त्यांचा संगीताचा वसा पुढे नेणारे शिष्य हे त्यांचे खरे वारसदार आहेत.

गुरुदास गांवकर म्हणाले, गुरुवर्य गाड सर व माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांनी स्थापित केलेला श्री बांदेश्वर संगीत वर्ग कायमस्वरूपी सुरू राहून सरांचे नाव कायम अजरामर रहावे अशी आमची सर्व शिष्यांची इच्छा आहे. काही चुकल्यावर कान पकडण्यासाठी गुरू असावा लागतो. आजकाल गुरू काही बोलले तर शिष्यांचा अहंकार लगेच जागा होतो. गुरूकडून विद्या प्राप्त करून घेण्यासाठी अहंकार खिशात घेऊन न फिरता तो बाजूला ठेवणे आवश्यक आहे. तरच तुमच्या ज्ञानात वाढ होऊ शकते, असा सल्ला दिला.

यावेळी सीताराम गावडे, गिरीश महाजन, भाऊ मिशाळ, संदेश देसाई, स्नेहा नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल केळुस्कर यांनी गणेशवंदन गीत तर गुरुदास गावकर यांनी गुरूवंदना सादर केली. त्यांना महेंद्र मांजरेकर यांनी हार्मोनियम तर राजेश सावंत यांनी तबला साथसंगत केली. सूत्रसंचलन व आभार आशुतोष भांगले यांनी मानले.

यावेळी उपाध्यक्ष सुशांत नाईक, सचिव राजेश सावंत,खजिनदार महेंद्र मांजरेकर, सहसचिव प्रविण परब, नारायण मोरजकर, नैतिक मोरजकर, दिनेश नाईक, गायत्री भांगले, संतोष परब, नंदू बांदेकर,सुधिर शिरसाट,प्रमोद कळंगुटकर, मंथन विरनोडकर, अचल पावसकर, यशवंत माधव आदींस अनेक जण उपस्थित होते.