बांदा (मंगल कामत)
गोगटे-वाळके महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

तरुण पिढीवर श्रमाचे संस्कार व्हायला हवेत या संस्कारक्षम पिढीकडून समाजाच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. बलशाली भारत बनण्यासाठी तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून देश सक्षम बनविण्यामध्ये या पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार असून तशा पद्धतीचे संस्कार होणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मा. सौ. श्वेता कोरगावकर यांनी केले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर पडवे माजगाव येथे आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सौ. श्वेता कोरगावकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा. श्री. डी. बी. वारंग होते. यावेळी व्यासपीठावर सहसचिव मा. श्री. डी. एस. पणशीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, पडवे माजगावच्या सरपंच मा. नयना देसाई, कार्यक्रम अधिकारी प्रा. रश्मी काजरेकर, प्रा सुधीर न्हावेलकर. प्रा. डॉ. शरद शिरोडकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक रश्मी काजरेकर यांनी केली. मा.सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
सुमारे सात दिवस निवासी असलेल्या या श्रमसंस्कार शिबिरात ग्रामस्वच्छता आणि रस्ते डागडूजी, पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारण, समाज प्रबोधन, पर्यावरण जागृती, व्यसनामुक्ती व आरोग्य संदेश, आपत्ती व्यवस्थापन, सांस्कृतिक, कला वारसा आणि दुर्लक्षित पर्यटन स्थळे, विकासात्मक उपक्रम असे विविध समाजाभिमुख उपक्रम घेऊन हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये एड्सविरोधी जनजागरण प्रभात फेरी काढून प्रबोधन करण्यात आले. तसेच आरोग्य विषयक माहिती व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी वासुदेव या कला प्रकाराचा वापर करत घरोघरी स्वच्छता संदेश फेरी काढण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने दोन बंधारे बांधण्यात आले. रस्त्याची डागडुजी, स्वच्छता मोहीत, सर्वेक्षण ग्रामस्थांशी सुसंवाद, बौद्धिक चर्चासत्रे आदी उपक्रमांच्या माध्यमातून एक वैचारिक प्रबोधन या सात दिवसांच्या दरम्यान करण्यात आले. यावेळी स्वयंसेवकाने दुर्लक्षित विविध कलाप्रकार आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सादर केले. योगाभ्यास करत असताना योगाबद्दल परिपूर्ण माहिती स्वयंसेवक व ग्रामस्थांना दररोज देण्यात आली. शिबिर कालावधीत विविध व्याख्यात्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.
“घेतलेल्या ज्ञानाचा वापर भावी जीवनासाठी करा. राष्ट्र उभारणीत युवकांच्या कल्पक उपक्रमांना संधी दिली जात आहे. याचा फायदा तरुण वर्गातील तरुण पिढीने घेणे अत्यावश्यक आहे. समाजाची बांधणी ही प्रत्येक नागरिकाच्या कृतीवर अवलंबून असते. त्यामुळे सकारात्मक कृतीवर आजच्या तरुण पिढीने भर द्यावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मा. विकास केरकर शिबिराच्या सांगता सोहळ्याप्रसंगी केले.





