बांदा : राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयाकडून गोवा बनावटीच्या दारूचे 3000 बॉक्स जप्त करण्यात आले. सदरची कारवाई बीएच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दोन कोटी 12 लाख 32 हजारच्या वाहनासकट जप्त करून दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली.

रात्री उशिरा पकडलेल्या गोवा दारूची किंमत 01 कोटी 87 लाख 20 हजार एवढी आहे तर एकूण मुद्देमाल गाडीसह 02 कोटी 12 लाख 32,000 एवढा आहे. ही सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राज्य उत्पादन अधीक्षक श्रीयुत तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर गुन्ह्यामध्ये राजशेखर सोमशेखर परगी ( वय 41 वर्षे ) रा. हुबळी, जिल्हा धारवाड व रहमतुला कासिम खान ( वय .41 ) राहणार कलम नगर, जिल्हा कारवार या दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
गोव्याकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर क्रमांक हा इन्सुली चेक पोस्टवर आल्यानंतर त्याची तपासणी केली असता सदर कंटेनरमध्ये गोवा दारूने भरलेले बॉक्स आढळून आले. सदर कारवाई डॉ. बी. एच. तडवी अधीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अमित अशोक पाडाळकर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडाळ व निरीक्षक संजय मोहिते तपासणी नाका इंन्सुली, दुय्यम निरीक्षक राहुल भीमराव मोरे, सहाय्यक दु. निरीक्षक रमाकांत धोंडू ठाकूर, जवान एच.आर. वस्त, जवान शरद मनोहर साळुंखे, वाहन चालक संदीप कदम आदींनी केली आहे.
पुढील तपास निरीक्षक अमित पडाळकर करत आहेत. मात्र गोवा ते मुंबई या मार्गावर रोज हजारो वाहने जात येत असतात. अशा वाहनांमधून ही दारू वाहतूक होत असते. मात्र तपासणी नाके असूनही त्यांना हुलकावणी देत ही वाहने पुढे जात असतात. गोव्यातून महाराष्ट्राकडे येणारा हा दारूचा महापूरच आहे आणि यामागे फार मोठी टोळी कार्यान्वित असल्याची शक्यता आहे.





