उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा हट्ट दीपक केसरकर यांनी सोडावा – अँड दिलीप नार्वेकर 

7

 

सावंतवाडी (मंगल कामत)

उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा हट्ट दीपक केसरकर यांनी सोडावा – अँड दिलीप नार्वेकर 

सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असलेली जागा भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेजच्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा हट्ट दीपक केसरकर यांनी सोडावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अँड. दिलीप नार्वेकर यांनी केले आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटीच्या जागेचा प्रश्न सुटण्यासाठी पुढची निवडणूक उजाडेल हे सत्य आहे. माझे आणि केसरकर यांचे काही वैर नसून आवश्यक ती पूर्तता करुन आयुर्वेदिक कॉलेजच्या जागेत मल्टीस्पेशालिटी उभारल्यास येथील आरोग्याचा प्रश्न कायमचा सुटेल असेही ते म्हणाले. सावंतवाडी येथे जिल्हा काँग्रेसची पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते.

 

 

जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये गेली 15 वर्ष आमदार असूनही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथील मूलभूत समस्या सोडवल्या नाही. या ठिकाणी आजही अनेक प्रश्न जनतेला भेडसावत असून त्याकडे त्यांचा लक्ष नाही‌.
आरोग्य शैक्षणिक आणि रोजगाराचा प्रश्न भयानक आहे. शिक्षणमंत्री असूनही ते शिक्षकांची रिक्त पदे भरू शकले नाहीत. डीएड बीएडधारक उपोषण आंदोलन करत आहेत. आरोग्याच्याबाबतीत आंबोली सारख्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लाईट नसल्याने बॅटरीच्या उजेडात प्रसूती करावी लागते हे सत्य आहे. हजारे कोटीचा निधी आणला असे केसरकर म्हणतात परंतु, तो निधी गेला कुठे हा प्रश्न आहे. विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. काँग्रेसच्या काळात आत्ताची असणारी प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आली. परंतु त्यांना पुढे नेण्याचे काम इथल्या लोकप्रतिनिधींनी केले नाही. त्यामुळे या ठिकाणी आता बदल घडवणे आवश्यक आहे. म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार राजन तेली यांना जनतेने आमदार म्हणून विधानसभेत पाठवावे असे आवाहन केले‌.

 

ॲड. दिलीप नार्वेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावेळी चमत्कार घडणार आहे आणि तीनही विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहे तशा प्रकारची जनतेची मानसिकता दिसून येत आहे. दुसरीकडे या ठिकाणी आरोग्याच्या प्रश्नावर जनतेतून आवाज उठवला जात आहे.
मल्टीस्पेशालिटीचे गाजर दाखविले जात आहे. मात्र मल्टीस्पेशालिटी आजही जागे अभावी अडकून पडले आहे. केसरकर यांनी आता उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा हट्ट सोडून द्यावा त्या ठिकाणी जागा उपलब्ध होणार नाही आणि पुढची निवडणूक येईपर्यंत मल्टी स्पेशालिटी उभे राहणार नाही त्यासाठी भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक काॅलेज संस्थेच्या माध्यमातून आवश्यक ती जागा आम्ही उपलब्ध करून देऊ त्या ठिकाणी आरसीसी पद्धतीने पिलर उभारण्यात आले आहे याच ठिकाणी मल्टीस्पेशालिटीची तब्बल 15 मजली इमारत उभे राहू शकते त्याला नगरपालिकेने मान्यताही दिलेली आहे शिवाय आतापर्यंत कॉलेजच्या माध्यमातून 15 हजार रुग्णांची शस्त्रक्रियाही करण्यात आले आहे. संस्थेची आवश्यकता प्रक्रिया पूर्ण करून ही जागा आम्ही देण्यास तयार आहोत केसरकर यांनी या जागेला विरोध न करता आपला हट्ट सोडून मल्टीस्पेशालिटी साठी पुढाकार घ्यावा.
यावेळी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, चंद्रकांत राणे, रुपेश आईर, राजेश गोवेकर, अभय मालवणकर, इलियात शेख बासित पडवेकर शिवा गावडे उपस्थित होते.