मळगाव घाटीत आढळलेल्या अत्यावस्थ युवकाला केले उपजिल्हा रुग्णालयात दाखल…!

198

सावंतवाडी : मळगाव घाटीतील रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चाकी गाडीमधील अत्यावस्थ युवकाला युवा कार्यकर्ता हेमंत वागळे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मळगाव घाटीतून हेमंत वागळे मळगावच्या दिशेने जात असताना मळगाव घाटीतील माया हॉटेल शेजारी ओळखीची गाडी उभे असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी गाडीच्या बाहेर उलटी केल्याचे दिसल्याने वागळे यांना संशय आला आणि त्यांनी आपली रुग्णवाहिका थांबवून त्या गाडीजवळ गेले असता त्या गाडीत एक युवक गंभीर स्थितीत दिसून आला. वागळे यांनी त्याला तात्काळ आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेत घालून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी वागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांना संपर्क करुन माहिती दिली.

पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी कोणताही विलंब न करता मळगाव घाटीत घटनास्थळी दाखल होत पुढील तपास करण्याच्या सूचना आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सदरचा युवक हा बांदा येथील असून त्याचे आडनाव महाजन असल्याची प्राथमिक माहिती वागळे यांनी दिली आहे. त्याला उलटी होण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून त्यांनी विष प्राशन, एखादे औषध प्याल्यामुळे किंवा प्रकृतीत बिघाड झाल्याने असे झाले का ? या संदर्भातील पुढील तपास सुरू आहे. त्याची प्रकृती खालावली असून तो बेशुद्ध अवस्थेत आहे.