देवगड (प्रतिनिधी)
देवगडात चप्पल दुकान फोडले ; मात्र हाती काही लागले नसल्याने दुकानातील चप्पल दिली बाहेर फेकून ; १५ दिवसातील चोरीची दुसरी घटना
देवगड एस्टी स्थानक परिसरातील चप्पल दुकानात चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केल्याने खळबळ उडाली असून ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली.काही दिवसापुर्वी एसटी स्थानक परिसराबाहेरील रस्त्यालगत असलेल्या स्टॉलमध्येही चोरीचे प्रकार झाले होते मात्र देवगड पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई न केल्याने व्यापारीवर्गातून संताप व्यक्त होत आहे.
देवगड एस्टी स्थानक परिसरात प्रमिला प्रभाकर दहिबांवकर यांच्या मालकीचे श्री समर्थकृपा हे चप्पल दुकान असून रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता दुकान बंद करून त्या दहिबांव येथे घरी गेल्या. सोमवारी सकाळी ६.४५ वा.नेहमीप्रमाणे त्यांनी येवून दुकान उघडले यावेळी दुकानाच्या मागील बाजुचा पत्रा त्यांना कोपऱ्यातून उघडलेला दिसला.तर त्या पत्र्याचा उघडलेल्या बाजुकडे दुकानात आत ठेवलेले चप्पल चोरट्यांनी काढून बाहेर फेकल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी या घटनेबाबत देवगड पोलिस स्टेशनला कळविल्यानंतर पो.हे.कॉ.उदय शिरगांवकर यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली व माहिती केली.तसेच याबाबत देवगड पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास सांगीतले. दरम्यान दहिबांवकर यांच्या दुकानात रक्कम ठेवलेली नव्हती मात्र दुकानाचा मागील पत्रा पुर्णत: काढण्यात चोरट्याला यश न आल्याने त्यांनी पत्रा काढण्याचा प्रयत्न करून आतील मिळेल त्या चप्पल बाहेर काढून त्या तेथेच टाकून पळ काढला.पंधरा दिवसापुर्वीच देवगड एसटी स्थानका बाहेरील भुजे यांचे भाजी स्टॉल व शिरसाट यांचे फुलांचा स्टॉल या दोन स्टॉलमध्येही चोरी झाली.यावेळी भुजे यांच्या दुकानातील किरकोळ रक्कम चोरीस गेली.त्यांनी पोलिस स्टेशनलाही कळविले व संशयित चोरट्यांबाबतही माहिती दिली मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने व्यापारीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या तसेच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असलेल्या परिसरातच लागोपाठ चोरीची ही दुसरी घटना घडल्यानंतर पोलिस यंत्रणेकडूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने चोरटे मोकाट सुटत असून पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.





