पाडलोस येथील  रस्त्याच्या धोकादायक साईडपट्टीचे काम तात्काळ करा ; मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी केली मागणी

11

बांदा (प्रतिनिधी)

 पाडलोस येथील  रस्त्याच्या धोकादायक साईडपट्टीचे काम तात्काळ करा ; मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी केली मागणी

पाडलोस मडुरा मार्गावरील पाडलोस येथे रस्त्याचे काम घाईघाईने करण्यात आले. रस्त्याची साईडपट्टी निर्धोक करण्यासाठी दगडही टाकण्यात आले, मात्र सद्यस्थितीत ते दगड धोकादायक ठरत असल्याने साईडपट्टीही धोकादायक बनली आहे. सदर काम तत्काळ करावे, अन्यथा अपघात घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी दिला.
न्हावेली-रेवटेवाडी मार्गे पाडलोस मडुरा येथून बांदा येथे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मे महिना अखेर पूर्णत्वास आले. काही ठिकाणी पाऊस सुरू असतानाच काम चालू होते. घाईगडबडीने केलेल्या रस्त्याची साईड पट्टी मात्र धोकादायक स्थितीत आहे. मागणीनुसार साईडपट्टीला दगड टाकण्यात आले मात्र अद्यापही ते दगड जैसे थेच आहेत. दोन वाहनांना बाजू देताना वाहन रस्त्याच्या बाहेर गेल्यास कलंडून अपघात होऊ शकतो. याची दखल संबंधित विभागाने घेऊन तात्काळ साईडपट्टी निर्धोक करावी, अशी मागणी शिवसेना मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी केली आहे.