सावंतवाडी (प्रतिनिधी)२ जून २०२४
मळेवाड येथील शासन आपल्या दारी उपक्रमाला दिली तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट
नुकत्याच दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे एक वर्ष व तीन वर्ष उत्पन्न दाखल्यांसाठी मळेवाड येथील सुदर्शन सभागृहामध्ये ‘दाखला आपल्या दारी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिरातचा लाभ घेतला.या शिबिराला सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट देत शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत घेतलेल्या या शिबिराचे कौतुक केले.सदरचे शिबिर हे ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरातील ज्या दाखलाधारक विद्यार्थ्यांचे दाखले तयार होतील त्यांना त्यांचे दाखले घरपोच देण्याची ही व्यवस्था उपसरपंच हेमंत मराठे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.या शिबिरामुळे विद्यार्थ्याचा वेळ व पैसा वाचला असून तात्काळ दाखले मिळणार असल्याने ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांच्याकडून या शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले जात असून उपसरपंच हेमंत मराठे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.या शिबिराला मुळेवाड तलाठी अनुजा भास्कर व आजगाव मंडळ अधिकारी कोदे ,सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील सेतूचालक आकाश मिसाळ व त्यांचे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.





