देवगड किल्ला येथे गढूळ पाणी पुरवठा ;  गढूळ पाण्याचे नमुने बाटल्यांमधून घेत भाजप नगरसेवक नगरपंचायत मध्ये

98

देवगड किल्ला येथे गढूळ पाणी पुरवठा ;  गढूळ पाण्याचे नमुने बाटल्यांमधून भरून घेत भाजप नगरसेवक नगरपंचायत मध्ये दाखल

देवगड / प्रतिनिधी १६ मे २०२४

दहिबाव नळयोजनेद्वारे देवगड किल्ला येथे गढूळ पाणी पुरवठा होत असून या गढूळ पाण्याचे नमुने बाटल्यांमधून भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी न. पं. मुख्याधिकारी सुरज कांबळे यांना दाखविले. या पाण्यामुळे काविळ अथवा साथीचे रोग उद्धवण्याची शक्यता असून यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केली. दहिबाव नदीपात्रातील पाण्याची पातळी सध्या घटली असून पंपिंगद्वारे सुरुवातीचे येणारे पाणी हे गढूळच येणार आहे. न. पं. हद्दीमध्ये ज्या प्रभागात नळयोजनेचे पाणी पहिले सोडले जाते, तेथे दहा मिनिटांचा वाढीव अवधी देऊन त्या वेळेतील पाणी नागरिकांनी वापरू नये. ते पाणी ‘फ्लश’ करावे. याबाबतचे नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी कांबळे यांनी भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिले.

देवगड किल्ला येथे नळयोजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा गढूळ होत असल्याची तक्रार तेथील ग्रामस्थ अमित गोळवणकर, हेमंत तोरस्कर, अशोक बळीराम गोळवणकर, सुधाकर वाडेकर, जयवंत गोळवणकर यांची होती. गढूळ पाण्याचे नमूने बाटलीतून घेत तक्रारदार ग्रामस्थांसमवेत भाजपचे न. पं. गटनेते शरद ठुकरुल, नगरसेविका अॅड. सौ. प्रणाली माने, सौ. तन्वी चांदोस्कर, सौ. रूचाली पाटकर, सौ. मनीषा जामसंडेकर, स्वीकृत नगरसेवक व्ही. सी. खडपकर, भाजपच्या महिला मोर्चा देवगड मंडल अध्यक्षा उषःकला केळूस्कर, राजू कावले यांनी गुरुवारी सकाळी न. पं. मुख्याधिकारी सुरज कांबळे यांची भेट घेतली. दहिबाव नळयोजनेच्या पाणी पुरवठ्याबाबत माहिती देताना न. पं. चे पाणी पुरवठा विभागप्रमुख चारुदत्त पारकर यांनी नळयोजनेची सद्यस्थिती नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना सांगितली. दहिबाव नदीपात्रात किमान आठ ते दहा दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे. फेब्रुवारीपासून नळयोजनेच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत होते. त्यामुळे आजतागायत पाणी पुरवठा सुरळीत होत होता. गेल्या आठवड्यात तांत्रिक बाबींमुळे पाणी पुरवठ्यात खंड पडला. नदीपात्रात जेथे पाणी आहे, तेथील माती बाजूला करून पाणी उपसा करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत तेथे जेसीबी लावून नदीपात्रातील शिल्लक साठ्याचा प्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल. या कामामुळे सुरुवातीच्या काही वेळेमध्ये सध्या गढूळ पाणी पुरवठा होत आहे. असे सांगितले. पाणी पुरवठा करण्यापूर्वी टीसीएल पावडर, तुरटी टाकून नंतरच पाणी पुरवठा करण्यात यावा. जेणेकरून आरोग्यविषयक समस्या निर्माण होणार नाहीत, अशा सूचना अॅड. सौ. माने यांनी केल्या. तर पाणी पुरवठ्याच्या वेळेच्या नियोजनाची माहिती घंटागाडी, सोशल मीडियावरून नळग्राहकांना द्यावी, असेही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सुचविले.

शिरगाव- पाडागर नळयोजनेवरून पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होते. त्यामुळे ते पाणी देवगड, जामसंडे शहराला मिळत नसल्याची माहिती न. पं. पाणी पुरवठा विभागप्रमुख पारकर यांनी दिली. यावर सौ. तन्वी चांदोसकर म्हणाल्या, पाणी चोरी होत असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची आहे? ही नळयोजना जर जि. प. च्या अखत्यारीत येत असेल तर ही समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबत न. पं. ने जि. प. प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे का? अशी विचारणा केली. यावर पारकर यांनी न. पं. मार्फत पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. मात्र, ही नळयोजना पत्रव्यवहारावरच ठेवायची का? पत्र व्यवहारावरच पाण्याच्या प्रश्न ठेवायचा का? असा जाब विचारला. यावर पारकर म्हणाले, या नळयोजनेवरून पाणी चोरी होऊ नये, यासाठी न. पं. चे दोन कर्मचारी रात्री ११ वा. पासून पहाटे ३ वा. पर्यंत गस्तीसाठी पाठविण्यात आले होते. यावेळी पाणी चोरीच्या उद्देशाने सुरू असलेले पाच वॉल आम्ही बंद केले. त्यानंतर पाणी पुरवठ्यासाठी थोड्या प्रमाणात पाणी मिळाले, असे सांगितले. देवगड, जामसंडे शहरात पाण्याची समस्या गंभीर बनली असून नळयोजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी तसेच पाणीप्रश्नाबाबत जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्यासमवेत न. पं. ने बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी सौ. चांदोस्कर यांनी केली.