श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा विशेष
महाशिवरात्री यात्रा उत्सव ८ ते ९ मार्च पवित्र तीर्थस्थान १० मार्च २०२४

देवगड (प्रतिनिधी)८ मार्च २०२४
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कुणकेश्वर गाव समुद्रकिनारी वसलेले आहे. येथे प्राचीन शिवमंदिर आहे. कुणकेश्वराचे मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे. कुणकेश्वर है एक तीर्थक्षेत्र आणि आता पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. कुणकेश्वर या प्राचीन मंदिराचा स्कंद पुराणात व संगमेश्वर महात्म्यात उल्लेख आढळून येतो.

कुणकेश्वर मंदिर हे फार कलाकुसरीने युक्त नसले तरी येथील जांभ्या दगडाने बांधकाम केलेले मजबूत आणि भव्य मंदिर आहे. कुणकेश्वर मंदिराला ‘दक्षिण कोकणची काशी’ असे देखील म्हटले जाते.
यावर्षी दिनांक ८ मार्च ते १० मार्च या काळात महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे.प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्र असते. माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्र’ म्हणतात. शिवभक्त शिवाची मनोभावे आराधना करून शिव मंदिरात जाऊन महादेवाचे
दर्शन घेऊन पिंडीवर दूध व पाणी याचा अभिषेक करून बेलपत्र अर्पण करतात. इंग्रजी महिन्यानुसार, ही महाशिवरात्र फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये असते अग्निपुराण शिवपुराण पद्मपुराण या पुराणांमध्ये महाशिवरात्रीचे महत्त्व सांगितले आहे.
महाशिवरात्रि विषयी बऱ्याच आख्यायिका प्रचलित आहेत.

हिंदू पौराणिक कथेनुसार, या रात्री भगवान शिवाने त्यांची दैवी पत्नी मां शक्तीशी दुसरे लग्न केले. त्यांच्या दैवी मिलनाचा उत्सव म्हणून हा दिवस ‘भगवान शिवाची रात्र’ म्हणून साजरा केला जातो. तर ब्रम्हा आणि विष्णू यांच्यात दोघात श्रेष्ठ कोण या झालेल्या वादात, त्यांच्यापेक्षा शंकर महान आहेत हे दर्शविण्यासाठी घेतलेले
महाकाय पिंडीचे रूप याच दिवशी महादेवांनी घेतले म्हणून शिवभक्त ही पवित्र रात्र साजरी करतात.

शिवरात्र एक उल्लेखनीय सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये “अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचा”
स्मरणदिवस आहे. हे शिवशंभुचे स्मरण करून आणि प्रार्थना, उपवास, नीतिमता आणि सद्गुणांचे पालन करून है
व्रत पाळले जाते. शिवसाधक यावेळी रात्रभर जागरण करतात. आपल्या शरीरात शिवतत्वापासून निर्माण झालेली ऊर्जा सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात.
‘महाशिवरात्र’ हा एक असा दिवस आहे की मनुष्याची अध्यात्मिक पातळी उच्च करण्यासाठी शिवरात्री केलेली साधना
मदत करते. आणि या काळाचा उपयोग करून घेण्यासाठी आपण हा उत्सव साजरा करतो. हे व्रत अहोरात्र चालते.’महाशिवरात्र’ म्हणजे अंधाराचा उत्सव आहे.
महाशिवरात्रीला शिवलिंगाला पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध तूप दही शेण आणि गोमूत्र लावून अभिषेक करतात.त्यानंतर धोत्रा व बिल्वपत्रांनी पूजा करतात. नारळ बिल्वपत्र पांढरी फुले शिवाला फार प्रिय आहेत.
महाशिवरात्रीच्या दिवशी भारतभर विविध तीर्थक्षेत्रे तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगाच्या स्थानी विशेष यात्रा भरतात.
आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शिवमंदिरातून ठिकठिकाणी महाशिवरात्र साजरी केली जाते.

देवगड तालुक्यातील ‘दक्षिण कोकणची काशी’ म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र म्हणजे ‘श्री क्षेत्र कुणकेश्वर”! माघ कृष्ण त्रयोदशी दिनांक ०८ / ०३ / २०२४ पासून पुढे तीन दिवस ही यात्रा भरणार आहे. कुणकेश्वर मंदिराचा संपूर्ण परिसर फार नयनरम्य आहे. मंदिराला एकूण ६ दरवाजे आहेत. मंदिराच्या परिसरामध्ये एक तलाव आहे. मध्यभागी शंकराची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते.मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य शिवलिंग आहे. मुख्य कुणकेश्वराच्या मंदिराबरोबरच इथे इतर देव-देवतांची मंदिरे देखील आहेत. या मंदिरांमध्ये जोगेश्वरी देवी मंदिर, भैरव मंदिर, श्री मंडलिक मंदिर, नारायण मंदिर, गणेश मंदिराचा समावेश होतो.
मुख्य मंदिरासमोर एक विशाल दीपस्तंभ आणि नंदीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवासची व्यवस्था केली आहे.

देवगड मधील कुणकेश्वराचे हे मंदिर अकराव्या शतकात यादवांनी बांधलेले मंदिर आहे. सोळाव्या शतकात मुघलांच्या काळात औरंगजेबाचा पुत्र शाहआलम याने मंदिरावर आक्रमण करून मंदिर उध्वस्त करण्याचा प्रयत्न कैला. शाह आलमकडून झालेल्या आक्रमणानंतर करवीरकर संभाजी राजे व पंत अमात्य यांनी ते दुरुस्त केल्याचा उल्लेख आढळतो.यामंदिराचे बांधकाम हे द्रविड शैलीमध्ये केल्याचे दिसून येते. अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावर वसल्यामुळे
कुणकेश्वर मंदिराची तटबंदी देखील तेवढीच भक्कम बांधण्यात आली आहे. मंदिराचा पाया ग्रेनाइट खडकाने बनविला आहे. कुणकेश्वर मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने केल्याचे स्पष्ट होते.
भगवान शंकराचे मंदिर असल्याने या मंदिरात सर्वात मोठा साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. या
मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी ३ दिवसांची भव्य यात्रा याठिकाणी भरते. या यात्रेवेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी मंदिरात पाहायला मिळते.
राज्याच्या अनेक भागातून लाखो भाविक कुणकेश्वर दर्शनासाठी हजर होतात. आंगणेवाडीच्या देवी भराडीची जत्रा आणि ही जत्रा यावर्षी एकाच आठवड्यादरम्यान होत असल्याने भाविकांची गर्दीही याकाळात भरपूर असणार आहे.
शिवरात्रीनंतर अमावस्येच्या दिवशी भाविक समुद्र स्नान करतात. तसेच जिल्हा भागातील काही देवस्थानांमधून देवस्वाऱ्या या दिवशी पवित्र स्नानासाठी या तीर्थक्षेत्रावर आपल्या लवाजम्यानिशी येतात. हा समुद्र स्नानाचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. देवत्वाची प्रचिती घ्यायची असल्यास यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहूनच हा अनुभव घ्यावा असा हा क्षण असतो.या यात्रेचे नियोजन अत्यंत चोखपणे केले जाते. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, मा. जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय, महावितरण, ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावचे मुंबई स्थित रहिवासी मंडळ यांच्याकडून है नियोजन केले जाते.

एसटी महामंडळासाठी हंगामी आगार व्यवस्था उभारून, एसटी पार्किंग साठी वेगळी व्यवस्था तर खाजगी वाहनतळ तयार केले जातात. तारामुंबरी मार्गे देवगड कडून जाणाऱ्या खाजगी वाहनांची मंदिरापासून काही अंतरावर पार्किंगची सोय केली जाते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून येथे जाण्यासाठी ज्यादा बसेसची सोय केली जाते. एका यात्रेमुळे फार मोठी आर्थिक उलाढाल होत असते. युवकांच्या हाताला काम मिळते. यात्रेतील सुरक्षा दृष्टीने येथील पोलिस यंत्रणा, तटरक्षक दलाचे कर्मचारी, गस्ती नौका, अग्निशमन यंत्रणा, जीव रक्षक यासाठी स्वयंसेवक काम करत असतात. यंदा स्वयंसेवकाचे भरारी पथकही काम करणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार
घडल्यास त्यावर पर्यायाने संपूर्ण जत्रेवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवलेले असतात अत्यंत चोखपणे या यात्रेचे नियोजन केले जाते. मंदिराच्या गेट पासून दर्शन रांगेची सुरुवात होते. रांगेतील भाविकांना मध्येच थकल्यासारखे वाटले तर बेंचेस व्यवस्था केली आहे. तसेच पिण्याचे पाणी देखील आहे. अशा पद्धतीने अतिशय शिस्तबद्ध रीतीने देवदर्शन पार पाडले जाते भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुखदर्शनाची व्यवस्था ही या यात्रेत केली जाते. अपंग व वयोवृद्ध भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनव्यवस्था यंदापासून केली जाणार आहे.यात्रेसाठी अनेक भागातून व्यापारी येथे उपस्थिती लावतात. विशेषतः खेळणी हॉटेल्स, कपडे, लोखंडी सामान अशा नानाविध प्रकारचे व्यापारी येथे येतात. ईळये गावातील कलिंगडे विकली जातात आणि मालवणी खाजा है।या यात्रेतील बाजाराचे खास आकर्षण आहे. समुद्रकिनाऱ्यावर पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, मक्याची भाजलेली कणसे व तत्सम पदार्थांची मनमुराद आस्वाद घेत या यात्रेचा आनंद घेता येतो. नवी जुनी मित्रमंडळी, नातेवाईकांच्या गाठीभेटी झाल्या की जत्रेचा आनंद कमालीचा द्विगुणित होतो.
यावर्षी मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती केली आहे.कातवण कडून मंदिराकडे येताना हिरव्यागार आमरायां नजरेस पडतात.

आपल्या भागात होणाऱ्या या जत्रा म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन असते. ही एकत्वाची भावना मनामनात निर्माण करणाऱ्या या जत्रा गेल्या शेकडो वर्षापासून आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग ठरल्या आहेत. डिजिटल युगात आता ऑनलाइन शॉपिंग सुरू झाले असले तरी अश्या जत्रेतून प्रत्यक्ष खरेदी करण्याचा आनंद निराळाच आहे. दरवर्षी ठराविक गोष्टी याच जत्रेत खरेदी करणारे भाविक नेमाने जत्रेला हजेरी लावतात.
कुणकेश्वर कडे येण्यासाठी मुंबई गोवा हायवे वरील नांदगाव तिठ्या वरून व मालवण पासून येताना आचरा मार्गे मंदिरापर्यंत पोहोचता येते. देवगड शहरातून आता मिठमुंबरी मार्गे मंदिराच्या दारात जाता येते.आपण आपल्या कुटुंबियांसह, आप्तेष्टांसह यावर्षी परमपवित्र श्री शिवाचे म्हणजे कुणकोबाचे दर्शन घेऊया,आपल्या सर्व ऐहिक पारलौकिक कल्याणासाठी श्रीशिवचरणी नतमस्तक होऊया !

शब्दांकन – सौ स्वाती चंद्रशेखर तेली, जामसंडे देवगड





