आनंदवाडी बंदरजेटी प्रकल्पाच्या रखडलेल्या कामात तातडीने सुधारणा होऊन काम मार्गी लावण्याची मागणी
महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उल्हास मणचेकर यांनी केली मागणी
देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुक्याची अर्थक्रांती बदलणारा महत्त्वाचा असा आनंदवाडी बंदरजेटी प्रकल्प मंजूर झाला . आणि अनेकांच्या आशा पल्लवीत देखील झाल्या. मात्र सद्यस्थितीत आनंदवाडी प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. येथील किनारपट्टी भागातील लोकांचा हा मच्छीमारी प्रमुख व्यवसाय असून या प्रकल्पामुळे देवगड शहराच्या विकासाला तसेच येथील उद्योग व्यवसायांना चालना मिळाली असती. त्यामुळे हा बंदरजेटी प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते मात्र तसे होत नाही. देवगड तालुका पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे . परंतु या प्रकल्पाच्या विलंबाने होत असलेल्या प्रक्रियेमुळे विकासागती थांबलेली दिसत आहे. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्याचा विचार करता आपण लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्हा महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन कॉंग्रेस सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष उल्लास मणचेकर यांनी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,मौजे देवगड आनंदवाडी प्रकल्प गेली ७/८ वर्षे चालू आहे.शासनाकडून कोट्यावधी रुपये वर्षानुवर्षे खर्च होताना दिसतात. परंतु प्रत्यक्षात जागेवर काहीही काम दिसत नाही. केवळ शासनाच्या पैश्याचा अतिरिक्त खर्चच दिसत आहे.स्थानिक मच्छीमारांची समस्या वर्षानुवर्षे तश्याच असून दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.सुरुवातीला भरावाचे काम मोठ्या प्रमाणात चालू होते. मात्र सदरचा ठेकेदार व कंपनी सोडून गेली.त्यानंतर नवीन एजन्सी नेमली मात्र त्या कंपनीकडून काम न होता खर्च अमाप होताना दिसत आहे.
खर्च झाला पण काम हवं त्या पद्धतीने चालू दिसत नाही. कोणत्याही पद्धतीचे आधुनिक सामग्री, मनुष्यबळ सदर एजन्सीकडे दिसत नाही. त्यामुळे कामावर कोणताही परिणाम दिसत नाही. त्याकामी तातडीने लक्ष घालून सदरच्या कामात सुधारणा दिसावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे





