हांगझोऊ : भारताचा युवा फलंदाज यशस्वी जायस्वाल याने वादळी फलंदाजी करत शतक ठोकले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत यशस्वी जायस्वाल याने शतक ठोकले आहे. असा पराक्रम करणारा यशस्वी पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. गोलंदाजाला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर यशस्वीने धावांचा पाऊस पाडला. यशस्वी जायस्वाल याने 48 चेंडूत शतक ठोकले. या शतकी खेळीमध्ये त्याने सात षटकार आणि आठ चौकार ठोकले. यशस्वी जायस्वाल याने ऋतुराजसोबत शतकी खेळी केली, त्यानंतर भारताची धावसंख्या वेगाने वाढवली.
भारताची दमदार सुरुवात –
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट प्रकारात भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये उप उपांत्य फेरीचा सामना सुरु आहे. भारताचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जायस्वाल यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिली. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने संयमी फलंदाजी केली, पण दुसऱ्या बाजूला यशस्वी जायस्वालने रौद्ररुप धारण केले होते. यशस्वी जायस्वाल याने षटकारांची बरसात केली. ऋतुराज आणि यशस्वी जायस्वाल यांनी शतकी सलामी दिली. अवघ्या 9 षटकात दोघांनी भारताचे शतक फलकावर लावले होते. यामध्ये ऋतुराज गायकवाड याने अवघ्या 22 चेंडूत पाच षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले होते. ऋतुराज गायकवाड याला मोठी खेळी करता आली नाही. ऋतुराज गायकवाड 23 चेंडूत 25 धावांवर बाद झाला. ऋतुराज गायकवाड याने या खेळीत 4 चौकार ठोकले.
रिंकुचीही वादळी खेळी, भारताच्या २०२ धावा –
रिंकू सिंगने अवघ्या 15 चेंडूत नाबाद 37 धावा झोडपल्या. यात त्याने 4 षटकार, 2 चौकार मारले. तर शिवम दुबेनेही 19 चेंडूत 25 धावा काढत उत्तम खेळी साकारली. भारताला 20 षटकात 202 धावा करता आल्या आहेत.
भारताची फलंदाजी ढेपाळली –
यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी वादळी सुरुवात केली. पण 103 धावांवर भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी हराकिरी केली. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. तिलक वर्मा आणि जितेश शर्मा यांना मोठी खेळी करता आली नाही. जितेश शर्मा अवघ्या पाच धावांवर तंबूत परतला.तर तिलक वर्मा याने दहा चेंडूत फक्त दोन धावा केल्या.




