भारतातील पहिल्याच सामन्यात कसा खेळला बाबर? ; ३४५ धावा करूनही पाकचा न्यूझीलंडने केला पराभव.

63

हैदराबाद : भारतातील 13 व्या वनडे वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला आहे. तब्बल 7 वर्षांनी पाकिस्तानी संघ भारतात सामने खेळणार आहे. कर्णधार बाबर आझम तर पहिल्यांदाच भारतात खेळणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा स्टार फलंदाज भारतात कशी कामगिरी करतो याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हैदराबादमध्ये दाखल झाल्यानंतर पाकिस्तान न्यूझीलंडविरूद्ध सराव सामना खेळत आहे. गेल्या वर्ल्डकपमधील उपविजेत्या न्यूझीलंडविरूद्धचा हा सामना पाकिस्तानसाठी सरावाची एक उत्तम संधी आहे.

या सराव सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना काही काळ थांबवावा लागला होता. जरी पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचा परिणाम पाकिस्तानच्या फलंदाजीवर झाला नाही.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 84 चेंडूत 80 धावांची खेळी करत पाकिस्तानला 150 धावांच्या पार पोहचवले. या खेळीत बाबरने 2 षटकार आणि 8 चौकार मारले. बाबर आझम  पाठोपाठ मोहम्मद रिझवानने देखील दमदार खेळी करत 94 चेंडूत 103 धावा चोपल्या. त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

या दोघांनी पाकिस्तानला 40 षटकात 250 च्या जवळ नेऊन पोहचवले होते. या दोघांव्यतिरिक्त सौद शकीलनेही चांगली फलंदाजी करत 75 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने दोन तर मॅट हेन्रीने एक विकेट घेतली.

पाकिस्तानने न्यूझीलंडला 50 षटकात 346 धावांचे विजयी लक्ष दिले. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करून 43.4 षटकातचं 346 धावा करून पाकिस्तानला सराव सामन्यात पाणी पाजले.