मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. घाना या देशात पार पडणाऱ्या ६६व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस नार्वेकर हजेरी लावणार होते . पण, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत ही परिषद भरवण्यात आली आहे. दौरा रद्द करण्याचं कारण अस्पष्ट आहे. राज्यात सध्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या एकूण ३४ याचिकांवर राहुल नार्वेकर सुनावणी करत आहेत. या सुनावणीवर ६ ऑक्टोंबर रोजी सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा पूर्वनियोजित होता. ते लोकसभा सभापती ओम प्रकाश बिर्ला यांच्यासोबत घाना येथे जाणार होते. पण, त्यांनी अचानक हा दौरा रद्द केला आहे.
आमदार अपात्रता सुनावणी सुरु असताना विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर जाणार असल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. खास करुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला होता. मागे, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला उशीर होत असल्यामुळे नार्वेकर यांना सुनावलं होतं. या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांचा दौरा रद्द झाल्याचं बोललं जात आहे.









