मुंबई : अभिनेता शाहरुख खानने आज मुंबईतील ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतलं. यावेळी शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम खान देखील त्याच्यासोबत होता. शाहरुखचा छोटा मुलगा अबराम हा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे, अबरामच्या गोड हास्यावर शाहरुखचे अनेक चाहते फिदा आहेत. बापलेकाच्या जोडीने ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांकडून आता हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शाहरुखनं वेधलं साऱ्यांचं लक्ष..
यावेळी शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी देखील त्यांच्यासोबत होती. शाहरुखने व्हाईट कुर्ता परिधान केला होता. एन्ट्री वेळी डोळ्यांवर गॉगल आणि मागे बांधलेल्या केसांच्या लूकने शाहरुखने सर्वांचं लश्र वेधून घेतलं. यावेळी नेहमीप्रमाणे चाहत्यांची मंडपात गर्दी देखील पाहायला मिळाली. शाहरुख मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्यानं भाविकांची उत्सुकता देखील शिगेला पोहचली होती.
मागील वर्षी फक्त धाकट्या मुलाने घेतलं दर्शन
2022 मध्येही गणेशोत्सवादरम्यान शाहरुखचा धाकटा मुलगा ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेण्यासाठी पोहोचला होता, त्यावेळी शाहरुख त्याच्यासोबत उपस्थित नव्हता. मात्र यंदा शाहरुख आणि अबराम यांनी एकत्र बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.
लालबागचा राजा आणि सेलिब्रेटींचं नातं
बॉलीवूडचे सेलिब्रेटी आणि लालबागचा राजा यांचं नातं तसं बरंच जुनं आहे. दरवर्षी लालबागच्या राजाला मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित राहत असल्याचं दिसून आलं आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठमोठे सेलिब्रेटी हजेरी लावत आहेत. त्यात किंग खानच्या उपस्थितीनं हजारो भाविकांचं लक्ष वेधून घेतलं.








