नवी दिल्ली- माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) प्रमुख एचडी देवेगौडा आणि त्यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांनी गुरुवारी दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेतली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन युतीबाबत चर्चा केली. भाजप आणि जेडी(एस) यांच्यामध्ये कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली. दोन्ही पक्षामध्ये जागावाटपाबाबतही चर्चा झाली. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. त्यातील चार जागा जेडी(एस)ला देण्याबाबत निर्णय झाल्याबाबत माहिती आहे.
देवेगौडा आणि कुमारस्वामी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन्ही पक्षातील युतीची औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुमारस्वामी यांनी आज झालेल्या बैठकीबाबत शुक्रवारी माहिती देणार असल्याचं स्पष्ट केलं. आम्ही किंवा भाजपने जागावाटपाबाबत काही विचार केला नाही. आज भाजप नेतृत्वासोबत चर्चा झाल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. कर्नाटकमधील २८ लोकसभेच्या जागांचा अभ्यास केला जाईल. याठिकाणी घेण्यात आलेल्या मागील निवडणुकीत काय परिस्थिती होती आणि विधानसभेच्या निवडणुकीचा परिणाम या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेऊ, असं कुमारस्वामी म्हणाले.
कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते बीएस येडीयुरप्पा यांनी जेडीएसला सोबत घेण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजप आणि जेडीएसमध्ये युतीच्या चर्चा सुरु झाल्या. जेडीएसला चार जागा मिळतील अशी शक्यता आहे. पण, कुमारस्वामी यांनी आणखी कोणत्याही निर्णयापर्यंत आलो नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान,मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या.








