गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या बसचा भीषण अपघात.! ; एका प्रवाशाचा मृत्यू तर १९ जण जखमी.

343

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरती एस.टी. बस आणि कंटेनर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. एस.टी बसने कंटेनरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला आहे. माणगाव जवळ असणाऱ्या रेपोली येथे पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

या भीषण अपघातात एस.टी. बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर, 19 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

तर बसमधील इतर जखमी प्रवाशांवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून राजापूरकडे निघालेल्या एस.टी. बसला हा अपघात झाला आहे. अपघातात बसच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान गणेशोत्सवासाठी मुंबईहून शहरातील अनेक जण गावी निघाले होते. अपघाताची माहिती मिळाताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत आहे.