विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला.! ; संजय राऊतांचा घणाघात.!

100

मुंबई : आमदार अपात्रेताचा मुद्दा मागील अनेक दिवसांपासून रेंगाळला आहे. ठाकरे गट सातत्याने आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा आग्रह करत होता. त्यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेण्यास तयार झाले. मात्र त्याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्यात एक फुल दोन हाफ सरकार आहे. विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत टाळाटाळ केली. आता त्यांनी आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेऊ असं जाहीर केलं आहे. मात्र महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकार आहे. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार होतं. ते सरकार पाडलं. मुख्यमंत्र्यांसह आधी १६ जण आणि नंतर काही अपात्र होते. त्यानंतर अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार फोडण्यात आले. ते देखील अपात्र आहेत, असं घटना सांगते.

दरम्यान शिवसेनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार घटनाबाह्य असल्याचं सांगितलं आहे. तरीही ज्यांचा पक्षांतर करणे धर्म आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चालढकल करत आहेत. त्यांनी कायद्याशी आणि घटनेशी द्रोह केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

एक वर्षापासून राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. अध्यक्षांनी घटनाबाह्य निर्णय घेतले. राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. घटनेवर ज्यांनी काम केलं ते देखील सध्याची स्थिती पाहून स्वर्गात अस्वस्थ झाले असतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

सध्याच्या सरकारच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे. अजित पवार जरी अनुभवी असले तरी त्यांची सरकार चालवताना दमछाक होत आहे. सरकारच्या दृष्टीने मराठा आंदोलनाचा मुद्दा किती गंभीर आहे हे आपल्याला क्लिप मधून दिसून आल्याचंही राऊत यांनी नमूद केलं.