Home ब्रेकिंग न्यूज बालकांच्या सुदृढ आयुष्यासाठी तृणधान्ययुक्त आहार गरजेचा.! – डॉ. विनया बाड. ; सावंतवाडी...

बालकांच्या सुदृढ आयुष्यासाठी तृणधान्ययुक्त आहार गरजेचा.! – डॉ. विनया बाड. ; सावंतवाडी येथे तालुकास्तरीय पाककला स्पर्धा २०२३-२४ संपन्न.

70

सावंतवाडी : आपल्या मुलांना चांगले, सुदृढ आयुष्य प्रदान करायचे असेल तर त्यांना तृणधान्ययुक्त आहार दिला पाहिजे. अलीकडच्या फास्टफूडच्या जमान्यात आईला वेळ नसल्यामुळे मुलं फास्टफूडच्या आहारी जात आहेत, त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येत आहे, असे प्रतिपादन डॉ. विनया बाड यांनी येथे व्यक्त केले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत सावंतवाडी तालुकास्तरीय पाककला स्पर्धा 2023-24 सावंतवाडी येथे संपन्न झाल्या. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, परीक्षक डॉ. विनया बाड, कृषी पर्यवेक्षक कविता सावंत, पीएमडब्ल्यू च्या श्रीमती निकिता सावंत, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शुभांगी खानोलकर, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, केंद्रप्रमुख अनंत कदम, सावंतवाडी नंबर १ शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता डांगी, केंद्रप्रमुख श्री. वालावलकर, श्री. म. ल. देसाई आदी उपस्थित होते.

 

यावेळी झालेल्या स्पर्धेत सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. रश्मी शुक्ल प्रथम, माडखोल मेटवाडी शाळेच्या पूजा शरद राऊळ द्वितीय, तर दानोली येथील अमृता बाबुराव गावडे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच उत्तेजनार्थ क्रमांक बांदा नंबर एकच्या उमांगी उमेश मयेकर यांनी तर मळेवाडच्या प्राजक्ता प्रकाश राऊत यांनी उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व स्पर्धा सावंतवाडी नंबर एक तालुका स्कूलमध्ये संपन्न झाल्या.

दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना परीक्षक कविता सावंत म्हणाल्या, भारत हा जगभरातील एकमेव देश आहे ज्या देशात सर्वाधिक तृणधान्य पिकविले जाते. मात्र दुर्दैवाने अलीकडच्या काळात आपण फास्टफूडकडे आकर्षित होत असल्यामुळे तृणधान्याची आपल्याला आठवणच राहत नाही. म्हणून शासकीय स्तरावरून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत प्रत्येक गावात आणि प्रत्येक शाळेत तृणधान्ययुक्त पाककला स्पर्धा घेऊन तृणधान्यबाबत जनजागृती केली जात आहे.

डॉ. विनया बाड यांनी सध्याच्या जीवनशैलीत तृणधान्याचा आहारात वापर आणि महत्त्व याचे विश्लेषण केले. यावेळी सहभागी स्पर्धक, महिला, कर्मचारी व पालक यांनी उपस्थिती दिली होती.

प्रास्ताविक सादर करताना गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके म्हणाल्या, शासन स्तरावरून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत सावंतवाडी तालुकास्तरीय पाककला स्पर्धा संपन्न होत आहेत. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 व दैनंदिन आहारात शालेय मुलांसाठी पोषक अन्न घटकांचा वापर करणेबाबत त्यांनी आवाहन करून हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल तालुक्यातील सर्व शाळा, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचे विशेष कौतुक केले.

दरम्यान या तालुकास्तरीय स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील केंद्रस्तरावरून प्रथम आलेल्या 17 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धा आयोजनासाठी विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, सावंतवाडीचे केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, सावंतवाडी नंबर एक शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता डांगे, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेच्या श्रीमती सुवर्णा अपराज यांनी आयोजनात उत्साही सहभाग घेतला. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन केंद्रप्रमुख वालावलकर यांनी केले तर प्रमोद पावस्कर यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीआरसी सावंतवाडी कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.