फुटकळ गोष्ट..!
“डॉक्टर, मी बदलायचे म्हणजे काय करायचे? समोरची व्यक्तीच जर राग येण्यासारखे वागत असेल तर त्यात दोष त्या व्यक्तीचा आहे, माझा नाही. माझे चिडणे दिसते. पण तिने काय केले ते ती सांगत नाही,” अविनाश म्हणाला.
त्यानंतर त्याने दोन दिवसापूर्वी घडलेला किस्सा ऐकवला. संध्याकाळची वेळ होती. अविनाशला बर्याच दिवसांनी ऑफिसमधून लवकर यायला मिळालं होतं. उर्मिलाने (अविनाशची बायको) त्याला चहा आणून दिला. तो चहा पीत असताना उर्मिलाने त्याला म्हटले, “आज फिरायला जाऊया का? बर्याच दिवसात आपण फिरायला गेलो नाही.” अविनाश फिरायला जायला तयार झाला. बाहेर निघण्यासाठी तयारी चालू असताना अविनाश म्हणाला, “उद्या जरा बाहेरची खोली लावूया. खूप पसारा झालाय.”
“घराला रंग काढायला हवा. भिंती बघा कशा दिसतात त्या,” उर्मिला म्हणाली.
“मी तुला सांगितलेय ना की फालतू खर्च करायचा नाही म्हणून. नेहमीचे खर्च भागवताना माझे नाकीनऊ येतात,” तो म्हणाला.
“मी काहीही घरात करायचे म्हटले की तुम्हाला ते नेहमी फालतूच वाटते,” ती म्हणाली.
“फालतू नाही तर काय? घरात बसून तुला एकेक सुचत राहतं. एकेक रुपया कमवण्यासाठी काय कष्ट करावे लागतात हे मला माहीत. मिळवायचे मी आणि खर्च करायचे तू,” तो म्हणाला.
“मग नोकरी करणारीच बायको करायची होती,” ती म्हणाली.
“शी. तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही,” तो म्हणाला.
“मग नकोच बोलू. मी नाही येत तुमच्या सोबत फिरायला,” ती म्हणाली.
आणि तो एकटाच बाहेर निघून गेला.
ही गोष्ट ऐकल्यावर मी म्हणालो, “तंतोतंत अशीच गोष्ट डॉ. एरिक बर्न यांनी 1962 साली लिहिलेल्या त्यांच्या ‘गेम्स पीपल प्ले’ या पुस्तकात दिली आहे. फक्त त्यातील पात्रांची नावे मिस्टर ॲण्ड मिसेस व्हाईट अशी आहेत. डॉ. बर्न म्हणतात की हा प्रसंग म्हणजे अजाणतेपणे खेळला गेलेला एक खेळ आहे.
“खेळ?…. डॉक्टर, मी असे मुद्दाम वागलेलो नाही,” अविनाश म्हणाला.
“डॉ. बर्नदेखील हेच सांगतात की ‘असा खेळ आपण खेळतो आहोत, हे या प्रसंगात सहभागी मंडळींना ठाऊक नसते.’ डॉ. बर्न यांनी या खेळाला नाव देखील दिले आहे, ते याला ‘काॅर्नर’ असे म्हणतात,” मी म्हणालो.
“हे म्हणजे रामायणासारखे झाले. आधी वाल्मिकींनी लिहीले आणि मग तसे घडले,” अविनाश म्हणाला.
तपशील बदलून असे प्रसंग आणि असे संवाद पिढ्यानपिढ्या घडत असतात. खरे म्हणजे आदल्या पिढीकडून पुढची पिढी हे शिकते आणि त्यासारखा प्रसंग उभा राहिला की स्क्रिप्टप्रमाणे संवाद घडतात.
डॉ. बर्न म्हणतात की ‘काॅर्नर’ या गेममध्ये तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा ‘बाहेर फिरायला जाणे’ ठरवण्याचा. दुसरा टप्पा ‘घराला रंग काढायला हवा’ या मागणीचा आणि तिसरा ‘दोघांनी फिरायला जाणे रद्द’ करण्याचा.
यातील पहीला टप्पा नाॅर्मल आहे. पण तो दुसर्या टप्प्याकडे नेला जातो.
जर दुसरा टप्पा टाळाता आला तर तिसरा टप्पा आपोआप टळेल आणि पहील्या टप्यात ठरवल्याप्रमाणे दोघे एकत्र फिरायला जातील.
“अविनाश, तुझ्या सध्याच्या आर्थिक अडचणी नसत्या तर उर्मिलाने घराला रंग काढण्याबाबत व्यक्त केलेली गरज अवास्तव होती का?”
“अवास्तव नव्हती. पण तिने माझी आर्थिक ओढाताण समजून घ्यायला नको का?” अविनाश म्हणाला.
“तिची इच्छा तुला मुद्दाम त्रास देण्याची असेल का?” मी विचारले.
“मुद्दाम नाही,” अविनाश थोडासा ओशाळून म्हणाला.
“अशा वेळी तिच्या बोलण्याला गांभीर्याने न घेता तिची अपेक्षा विचारात घ्यावी. तिच्या मताला किंमत आहे, हे तुझ्याकडून व्यक्त होणे हीच तिची अपेक्षा असेल ना,” मी म्हणालो.
“मग माझ्या अपेक्षेचा तिने नको का विचार करायला?” अविनाश म्हणाला.
“तू जसा तिच्या अपेक्षेचा विचार करू शकला नाहीस तसेच कदाचित ती तुझ्या अपेक्षेचा विचार करू शकली नसेल. तुझ्यासमोर आर्थिक अडचणी आहेत, आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तू किती कष्ट करतोस हे तिने समजून घेणे ही तुझी खरी अपेक्षा आहे. त्यामुळे तुझ्या बोलण्याला गांभीर्याने न घेणे तिने करायला हवे. पण हे तिच्याशी बोलायला हवे,” मी म्हणालो.
त्यानंतर उर्मिला देखील भेटायला आली. तिच्याशी देखील या खेळाविषयी मी बोललो. या खेळात रागाने ‘मी तुझ्यासोबत फिरायला येत नाही’ असे जेव्हा ती बोलते, तेव्हा तिच्या बोलण्याचा उद्देश ‘फिरायला जाणे रद्द करणे’ हा नसतो, तर ‘तिच्या मताला किंमत मिळत नाहिये’ हे व्यक्त करणे हा असतो. पण अविनाश देखील तिच्या बोलण्याच्या उद्देशाला विचारात न घेता, तिचे शब्द तेवढेच पकडतो. त्यात ती ‘काॅर्नर’ होते. हे तिच्या लक्षात आणून द्यावे लागले.
आपण अजाणता खेळ खेळतोय हे लक्षात आल्यावर अविनाश आणि उर्मिलाने आपल्यात बदल करायला सुरुवात केली.
थोडक्यात, बदल होण्यासाठी मूळात समस्या काय आहे, याची स्पष्ट जाणीव होणे हा महत्त्वाचा टप्पा असतो. तो एकदा साध्य झाला की अर्धे यश मिळालेले असते.
…..
लेखक – डॉ. रुपेश पाटकर., सिंधुदुर्ग.





