साओ पावलो : तीन विश्वचषक विजेते आणि फुटबॉलपटूमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या पेले यांना मागे टाकून नेयमार ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल झळकावणारा खेळाडू बनला आहे. बोलिव्हियाविरुद्ध विश्वचषक पात्रता सामन्यातील नेयमारने दोन गोल नोंदवले. यापैकी पहिल्या गोलसह नेयमारने ब्राझीलकडून सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावे केला.
बेलेम येथे झालेल्या या सामन्यात ३१ वर्षीय नेयमारने आपला पहिला गोल ६१व्या मिनिटाला गोल झळकावला. हा त्याचा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ७८वा गोल होता. यामुळे त्याने पेले यांच्या ७७ गोलचा विक्रम मोडीत काढला. ब्राझीलने या विश्वचषक पात्रता सामन्यात ५-१ असा विजय नोंदवला. नेयमारने या सामन्यात संघासाठी चौथा व पाचवा गोल झळकावला. आता त्याचे एकूण ७९ गोल झाले आहेत.





