रोहा बंदचं ..! सकल मराठा समाजाच्या हाकेला व्यापारी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद..!

61

रायगड/रोहा : शशिकांत मोरे

जालना येथे उपोषणास बसलेल्या मराठा समाज बांधवांनावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आज मराठा समाजाच्यावतीने रोहा बाजारपेठ बंदची हाक दिली होती.या हाकेला व्यापारी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बहुतांश व्यापारी बांधवांनी आपली दुकानें बंद करून मराठा समाजच्या बंदला जाहीर पाठींबा दर्शविला.


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला.व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करून रक्तबंबाळ केले हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा,अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल असे आवाहन रोह्यात सकल मराठा समाज बांधवांनी केले.या नंतर आज रविवारी सकाळी १० ते १२ वा. पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन सकाल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी केले.या आवाहानाला व्यापारी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मात्र रोहा बंदच्या दरम्यान बाजार पेठेत सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाला.