मुंबई : शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आजच्या सुनावणीसाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असून आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे या प्रकरणातील सहआरोपी असलेले संजय राऊत यांनी कोर्टात स्वतः हजेरी लावली होती. या नंतर या दोघांनी आपला जामीन अर्ज कोर्टापुढे सादर केला. त्यानंतर 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर या दोघांना ही जामीन मंजूर करण्यात आला.
या पुढची सुनावणी ही 14 सप्टेंबर रोजी होणार असून त्या वेळीही या दोघांनाही हजेरी लावावी लागेल. उद्धव ठाकरे हे राज्यातील अतिमहत्त्वाचे व्यक्ती आहेत, तसेच त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना प्रत्यक्ष हजेरी लावण्यापासून सूट देण्यात आली आहे. पुढच्या सुनावणीवेळीही उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती लावतील.
राहुल शेवाळे आणि संजय राऊत यांच्यातील वादाचा हा मुद्दा आहे. खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटासोबत गेल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली होती. दुबईतील कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये राहुल शेवाळे यांची गुंतवणूक असल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला होता. यामुळे आपली बदनामी झाल्याचं सांगत राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.





