अहमदाबाद : गुजरात पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. फुटबॉल बेटिंग अॅपच्या माध्यमातून एका चिनी व्यक्तीने तब्बल 1,400 कोटी रुपये लुटले असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार केवळ 9 दिवसांमध्ये घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, या अॅपच्या जाळ्यात अडकून गुजरातमधील तब्बल 1,200 जणांचे पैसे लुटले गेल्याचं स्पष्ट झालं आहे. एवढ्या मोठ्या स्तरावर झालेला हा स्कॅम पाहता गुजरात पोलिसांनी तपासासाठी एका एसआयटीची स्थापना केली आहे.
काय आहे प्रकरण?
गुन्हे अन्वेषण शाखेने याबाबत अधिक माहिती दिली. चीनमधील शेनझेन प्रांतात राहणारा वू उयानबे हा व्यक्ती या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं CID अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2022 साली जून महिन्यात याबाबत पहिल्यांदा माहिती समोर आली होती. “Dani Data” या अॅपच्या माध्यमातून गुजरात आणि यूपीमधील व्यक्तींची फसवणूक होत असल्याचं समोर आलं होतं. याचे धागेदोरे उत्तर गुजरातमध्ये असल्याचं तपासात दिसून आलं होतं.





