‘टोल भरा आणि मरा.! ; राज ठाकरे संतापले.

97

मुंबई :  कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे. यापार्श्वभूमीवर राज ठाकरे पनवेलमध्ये आले आहेत. आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी ते येथे आले आहेत. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीवरुन सत्ताधारी पक्षावर टीका केली. सध्या महाराष्ट्रात निर्लज्जपणाचा कळस सुरु आहे, असं ते म्हणाले. समृद्धी महामार्गाला फेन्सिंग घातलेली नाही. रस्त्यावर जनावरे येत असतात, तेव्हा त्याला काय करावं. चारशे दिवस झाले रस्ता लोकांसाठी खुला करुन दिला आहे. आतापर्यंत साडेतीनशे लोक मृत्यूमुखी पडलेत. तेथे काम केलं नाही, पण टोलनाका उभा केला आहे. म्हणजे इथे टोल भरा आणि मरा, अशी परिस्थिती असल्याचं राज म्हणाले.

कोकणातील रस्त्यांची भीषण अवस्था झाली आहे. सत्ताधारी पक्ष काय करतोय माहिती नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. भाजपने जरा या रस्त्यांकडे लक्ष द्यावे. आमदार फोडण्यापेक्षा पक्ष निर्माणावर भर द्यावा. तुरुंग कसा असतो हे छगण भुजबळ यांनी अजित पवारांना सांगितलं असेल म्हणून ते भाजपसोबत गेले असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्री म्हणतात महामार्ग पूर्ण होईल. पण मृत्यूमुखी पडलेल्यां लोकांचं काय. अडीच हजार लोक आतापर्यंत मृत्यूमुखी पडले आहेत. चांद्रयान कशाला पाठवलं. खड्डेच पाहायचं होतं तर इथेच सोडायचं होतं. मुंबई-गोवा महामार्गावर आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाले… पण रस्ता झाला नाही. रस्त्याचे काम होत नसताना परत परत त्याच पक्षांना का निवडून दिलं जातं. मला महाराष्ट्राच्या जनतेचं कळत नाही, असं राज म्हणाले.