ओझर विद्यामंदिरमध्ये डॉ. रुपेश पाटकर यांचे मार्गदर्शन ; ‘विद्यार्थी व मानसिक आरोग्य’ विषयावर चर्चासत्र संपन्न!

66

मालवण : ‘बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण’च्या वतीने ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांचे नुकतेच ‘विद्यार्थी व मानसिक आरोग्य’ या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. विद्यार्थ्यांमधील गुण आणि अवगुणांचे रूपांतर चांगल्या कौशल्यांमध्ये कसे करता येईल, याबद्दल अनेक उदाहरणे देऊन डॉक्टर रुपेश पाटकर यांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्यांना व क्षमतांना जागृत केले. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष कृतीयुक्त सहभाग घेऊन, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून, त्यांच्याशी संवाद साधून आणि विविध मनोरंजनात्मक खेळ घेऊन किशोरावयीन मुलांमधील असणारी मैत्री, आकर्षण, प्रेम, भावनिक ताण-तणाव व त्याचे फायदे तोटे यावर सुंदर मार्गदर्शन केले. ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला.

ओझर विद्यामंदिरमध्ये अशा प्रकारच्या अनेक चर्चासत्रांचे, मार्गदर्शन वर्गांचे आणि शिबिरांचे नेहमीच आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळून ओझर विद्यामंदिच्या विकासासाठी असेच नवनवीन उपक्रम राबविणार असल्याचे ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी सांगितले. या चर्चासत्राला बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणचे व्यवस्थापक संजय आचरेकर, बालविकास प्रकल्प शिक्षिका वैष्णवी आचरेकर, कौटुंबिक सल्ला केंद्र समुपदेशक अदिती कुडाळकर, विजय कुडाळकर तसेच ओझर विद्यामंदिरचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशालेचे शिक्षक पी. के. राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.