कुडाळ : येथील महिला रुग्णालयाचीच जागा “सिव्हील” साठी योग्य आहे. त्या ठिकाणी थोडक्या खर्चात जिल्हा रुग्णालय उभे राहू शकते, असा दावा कुडाळ सुधार समितीचे पदाधिकारी प्रसाद शिरसाट यांनी केला आहे. दरम्यान कुडाळ शहर हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे हा पर्याय सर्वांनाच सोईचा ठरेल. दुसरीकडे तालुक्याची आरोग्य यंत्रणा सुद्धा सुधारेल. त्यामुळे या ठिकाणीच जिल्हा रुग्णालय येण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जिल्हा रुग्णालय अन्यत्र हलविण्यासाठी सुरू झालेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर श्री.शिरसाट यांनी आपली प्रसिद्धी पत्रकातून प्रतिक्रिया दिली.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, कुडाळ ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीत अनेक त्रुटी असून लालफितीच्या कारभारामुळे ते दुरावस्थेत खितपत पडले आहे. तर महिला रुग्णालय हे महिला व बाल रुग्णांसाठी आहे. तेथे खर्च झालेला शासनाचा पैसा वाया जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या ठिकाणीच जिल्हा रुग्णालय आल्यास तालुक्याचीही आरोग्य यंत्रणा सुधारेल. तसेच महिला रुग्णालयाचा अजूनही विस्तार बाकी आहे. थोडक्या खर्चात त्याचे रूपांतर “सिव्हिल” रुग्णालयात होऊ शकते. तसेच कुडाळ जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे ते जिल्हावासियांना सुद्धा सोयीचे ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
एखाद्या कुंटुबातील रुग्णाला उपचारासाठी दुसरीकडे नेल्यानंतर होणारी आर्थिक फरफट, मानसीक व शारीरीक तणाव यातून सुटका हवी असेल तर भविष्यात जिल्हा रुग्णालय कुडाळमध्ये येण्यासाठी सर्व नागरीकांनी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.




