देवगड : विद्यार्थ्यांना पावसाळी ऋतूमध्ये परिसरात मिळणाऱ्या भाज्यांची ओळख निर्माण व्हावी यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विविध ऋतूमध्ये मिळणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्या या आपल्या आरोग्यासाठी उत्तमच असतात. केवळ बाजारात मिळणाऱ्या भाज्यांचा आहारामध्ये समावेश न करता परिसरात मिळणाऱ्या रानभाज्यांचा सुद्धा आहारामध्ये समावेश आवश्यक आहे. सहशालेय उपक्रमाचा भाग म्हणून शाळेमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समिती देवगडचे कृषी अधिकारी श्री दिगंबर खराडे व विस्तार अधिकारी कृषी श्री अभिजीत मदने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत परिसरातील रानभाज्यांची माहिती देत त्यांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारात तसेच पोषण आहारात यांचा समावेश असावा असे आवाहन पालक वर्गाला केले.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत विद्यार्थ्यांना शेती विषयक उपक्रमांची माहिती मिळावी अवजारांची माहिती मिळावी यासाठी बांधावरची शाळा या उपक्रमाप्रमाणेच विविध उपक्रमांचे आयोजन करावे यासाठी शालेय वेळापत्रकामध्ये तीन दिवस राखून ठेवले आहेत. परिसरात मिळणाऱ्या रानभाज्या विद्यार्थ्यांना परिचित व्हाव्यात यासाठी अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती शिक्षक सचिन जाधव यांनी दिली. केंद्रप्रमुख पारकर मॅडम यांनी उपस्थिताना रानभाज्यांचे महत्त्व सांगितले व विविध पालकांसह रानभाज्यांची खरेदी केली. विद्यार्थ्यांना या उपक्रमातून खरेदी विक्रीचे महत्त्व कळाले. दैनंदिन जीवनातील व्यवहार अशा माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवता आला.

उपस्थित पालकांमधून या उपक्रमाबाबत समाधानकारक प्रतिक्रिया देण्यात आल्या. रानभाज्यांच्या खरेदी विक्रीमध्ये मुले व पालक दंग होते. विविध स्टॉलवर रानभाजी खरेदीसाठी झुंबड उडाली होती. या प्रदर्शनात आवळा ,अळूची पाने,पालक, मेथी, लालमाठ ,शेवग्याच्या शेंगा ,शेवग्याचा पाला लिंबू,मिरच्या,टाकळा,कुर्डू,काकड्या,कारली,भेंडी, गवार,वांगी,शेपू,करटोली भारंगी कटला कढीपत्ता पेवगा ,खोडशी , दुधी भोपळा,कांदा पात,चहा पात,घोट्याची वेल, चुरण, फोडशी,केनी, अडाळी, एकपानी, काठला या सारख्या विविध प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या.
यावेळी देवगड केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती स्नेहा पारकर , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रेया मांडवकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षक पालक संघाचे सदस्य माता पालक संघ सदस्य परिसरातील नागरिक ,पालक इत्यादी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी सर्व पालक विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक अस्मिता मोंडकर, शिक्षक सचिन जाधव , श्रीमती वेदा साळसकर,श्रीमती मृण्मयी मुणगेकर यांनी विशेष मेहनत घेतली.





