अमरावती : प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांची अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांच्या गटाने काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत बच्चू कडू यांची अध्यक्षपदी तर अभिजीत ढेपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. या विजयानंतर बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. बच्चू कडूंना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली आहे.
या विजयानंतर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “हा दडपशाहीच्या विरोधातला विजय आहे. तुम्हाला माहीत आहे, या बँकेतून कर्ज मिळावं म्हणून शेतकऱ्यांना आणि संचालकालाही उपोषण करावं लागलं होतं. त्या गोष्टीचा बदला म्हणून आज आमचा विजय झाला आहे. आपल्याच कार्यकर्त्याला वाईट वागणूक दिल्यानंतर काय परिणाम होतो? हेच या निवडणुकीतून दिसलं. आम्ही नावाने कडू असलो तरी आम्ही लोकांशी गोड बोलतो, हेच या निवडणुकीतून दिसून आलं आहे.”





