बांदा : सह्याद्री पट्ट्यात कोसळणार्या मुसळधार पावसाचा फटका गोव्यातील पर्यटकांना बसला. दोडामार्ग तालुक्यातील घारपी येथे पर्यटनासाठी गेलेल्या २४ हून अधिक पर्यटकांचा ग्रुप धबधब्याखाली अडकले होते.
बांदा पोलिसांनी सतर्कता दाखवित अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टाळला असून सुदैवाने सर्व पर्यटक सुखरूप बचावले आहेत. घारपी येथे २४ पर्यटक धबधब्याखाली अडकून पडले. यासंदर्भात डायल ११२ पोलीस प्रणाली वर कॉल आला होता. बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांनी तात्काळ सूत्र हलवली व ते आपल्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले व पोलीस ठाण्यातील ८ अंमलदार यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी गेले. घारपी ते असनिये रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने म्हापसा गोवा येथून पर्यटनासाठी आलेले २४ लोक त्यांच्या गाडीसह अडकलेले होते. त्यांना त्या ठिकाणावरून सुरक्षितरित्या काढून त्यांच्या घरी रवाना करण्यात आले. बांदा पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
घारपी येथे पर्यटक अडकल्याची माहिती सामाजिक बांधिलकी जोपासणारे रवी जाधव यांना सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. त्यांनी तात्काळ आपल्या टीम आणि साहित्यासह पोलिसांच्या आपत्कालीन टीमसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र तत्पूर्वीच बांदा पोलीसांनी सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले होते.





