कणकवली : सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शिंदे गटाचे हात कणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बेळगावला जाणार होते. याबाबत माहिती कळताच कर्नाटक प्रशासनाकडून ताबडतोब त्यांना बेळगाव प्रवेश बंदी लागू करण्यात आली. बंदी लागू केली असतानाही खासदार धैर्यशील माने बेळगावात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील याला अटकाव करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा कागल-कोगनोळी फाटा परिसरात कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यामध्ये कर्नाटकसह महाराष्ट्रातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी सीमा भागामध्ये १७ जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो .आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या या हुतात्म्यांना अभिवादन केलं जातं. यासाठी सीमा भागासह महाराष्ट्रातील अनेकनेते बेळगावमध्ये उपस्थित राहतात. महाराष्ट्रातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव मधील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचं जाहीर केले होते.
याची माहिती मिळताच कर्नाटक प्रशासने तातडीने रात्री उशिरा त्याना बेळगाव प्रवेश बंदी लागू केली. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे दूधगंगा नदी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.





