शिरगाव स्मशानभूमी, आरोग्य केंद्राच्या परिसरांचे स्वच्छतेने रुपडे पालटले…!

देवगड : महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या विद्यमाने देवगड तालुक्यातील शिरगांव येथील श्री समर्थ बैठकच्या श्री सदस्यांनी शिरगांव स्मशानभूमी व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव या दोन्ही सार्वजनिक ठिकाणांच्या परिसराची रविवारी साफसफाई करून स्वच्छता मोहीम राबविली.

स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ. सचिन धर्माधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांवोगांवी स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत. शिरगांव येथील श्री समर्थ बैठकीच्या ५० श्री सदस्यांनी शिरगांव स्मशानभूमी आणि प्राथमिक आरोग्य केद्राच्या परिसराची साफसफाई केली. स्मशानभूमी येथील २७ गुंठ्यांच्या परिसरातून सुमारे १० ट्रॅक्टर पाला पाचोळ्याचा सुका कचरा जमा करण्यात आला.

सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या या स्वच्छता मोहिमेस ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव-शेवरेचे उपसरपंच अमित साटम यांनी भेट दिली व डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येणारे सर्वच उपक्रम समाजपयोगी असून इतरांनाही दिशादर्शक आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक असून यातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे सांगून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या दोन्ही सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेने परिसरांचे रुपडे पालटले आहे.

यापूर्वी  ‘श्री सदस्यांनी’ शिरगांव गांवचे ग्रामदैवत श्री पावणाईदेवी देवालय, ग्रुप ग्रामपंचायत शिरगांव-शेवरे आदी परिसरांची साफसफाई करून स्वच्छता मोहीमा यशस्वीपणे राबविल्या आहेत. या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.