सावंतवाडी : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तळवडे येथील विष्णू पेडणेकर यांच्या शेतामध्ये यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक नुकतेच पार पडले. मॅट पद्धतीने रोपवाटिका करुन आठ ओळीच्या मशीनने लागवड पूर्ण करण्यात आली.
सदर लागवडीचा शुभारंभ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांचे हस्ते झाला. या कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी पी. पी. पाटील, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, माजी सभापती पंकज पेडणेकर, कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे , मंडळ अधिकारी श्री. नलावडे, तळवडे सरपंच वनिता मेस्री, कृषी सहाय्यक ममता तुळसकर, प्रिया सावंत, छाया मेस्त्री आदी उपस्थित होते.
दरम्यान कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे यांनी मॅट रोपवाटिका व यांत्रिक भात लागवडीबद्दल माहिती दिली.प्रसाद पेडणेकर यांनी ही भात लागवड पद्धत कमी वेळेत व कमी खर्चात होणारी व तणावमुक्त आहे, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत व इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व मते जाणून घेतली. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी यांनी स्वत: यंत्राद्वारे भात लागवड केली.





