कणकवली : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गोवण (कोकणी) भाषेतून उद्घोषणा दिल्या जातात. त्यामुळे ही एक्सप्रेस केवळ गोव्यासाठीच सोडलीय असा प्रश्न निर्माण होत असल्याची टीका मनसे नेते परशूराम उपरकर यांनी आज केली. तर वंदे भारतला सावंतवाडी किंवा कुडाळला थांबा मिळायलाच हवा. तरच जिल्हावासीयांना या गाडीचा खऱ्या अर्थाने फायदा होईल असे ते म्हणाले. येथील मनसे कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जर गोव्याच्या कोकणी भाषेमध्ये उद्घोषणा होत असेल तर आमच्या मालवणी भाषेतूनही उद्घोषणा व्हायला हवी अशी आमची मागणी आहे. इतर भाषांबरोबरच वारंवार कोकणी भाषेतून उद्घोषणा होत असल्याने ही एक्सप्रेस केवळ गोवा राज्यासाठीच सोडलीय का असा प्रश्न सर्व प्रवाशांमध्ये निर्माण होत आहे. ते म्हणाले, सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यामुळेच कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण होऊ शकला. वंदे भारत एक्सप्रेसला कणकवलीत थांबा दिल्याने वैभववाडी, कणकवली, देवगड आणि मालवण तालुक्यातील प्रवाशांना या गाडीचा फायदा होणार आहे. तर सावंतवाडी किंवा कुडाळला थांबा मिळाला तर सिंधुदुर्गातील उर्वरीत तालुक्यातील प्रवाशांचीही सोय होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जर या गाडीला दोन थांबे मजंूर होत असतील तर सिंधुदुर्गातही दुसरा थांबा मिळायला हवा. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना आधीच ४० टक्के अधिभार आहे.
त्यामुळे इतर मार्गापेक्षा कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे भाडे जास्त आहे. त्यात आता वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास आणखी महाग केला आहे. जेवण, नाश्ता, चहाची मागणी केली तर या वस्तुंच्या दराबरोबर आणखी ५० रूपये आकारणी केली जाते, ही चुकीची बाब आहे. तसेच कणकवली पर्यंतच्या प्रवासासाठी १५७ रूपये हे चहा, नाश्ता आणि जेवणासाठी अतिरिक्त आकारले जातात. मात्र या रक्केतून केवळ चहा, दोन मारीची बिस्कीटे, पाणी बॉटल अाणि पाकिटावर दहा रूपये किंमत असलेला नाश्ता दिला जातो. त्यामुळे जेवणासाठीचे दर कमी असावेत असेही श्री.उपरकर म्हणाले





