मुंबई – गोवा हायवेवर कणकवली शहरातील ओव्हरब्रिज धबधबे झाले प्रवाहित.!

120

आ. नितेश राणेंनी देखील मागील वर्षी केल्या होत्या सूचना.!

मात्र सूचनांनंतरही हायवे प्राधिकरण ठेकेदार सुशेगातच.?

कणकवली | मयुर ठाकूर : मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात पावसाची प्रतीक्षा संपली असून शुक्रवार पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. शुक्रवार व शनिवारी सुरू झालेल्या या पावसानं कणकवली शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे.

यामुळे कणकवली शहरातील नरडवे फाटा ते जाणवली उड्डाणपूल पर्यंतचे जे ओव्हरब्रिज आहे त्यावर मागील दोन वर्षांपासून चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे ओव्हरब्रिज वरील पाण्याचा निचरा होण्यासाठी बसविण्यात आलेले पाईप हे अक्षरशः पर्यटनात्मक धबधब्याचे रूप घेऊन वाहत आहेत. त्यामुळे हे सर्व्हिस रस्त्यावरच दोन्ही बाजूला कोसळणारे धबधबे आता येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांचे डोकेदुखी ठरत आहे.

आमदार नितेश राणेंनी देखील प्राधिकरण व ठेकेदारांना दिल्या होत्या सूचना

कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी देखील या संदर्भातमागील वर्षी हायवे प्राधिकरण व ठेकेदार यांच्या या संदर्भात सूचना केल्या होत्या. मात्र याकडे ठेकेदार आणि प्राधिकरणाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पुन्हा दुसऱ्यांदा कणकवली शहरात ओव्हर ब्रिजवरून सर्व्हीस रस्त्यावर धबधबे कोसळू लागले.

किमान आतातरी हे सुशेगात असलेलं हायवे प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन केलेलं नित्कृष्ट दर्जाच काम पुनःश्च सुस्थितीत आणतील का ? की पुन्हा यावर्षी देखील दुर्लक्ष करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गटारे असताना देखील सर्व्हिस रस्त्यावर वाहू लागले ओहोळ.!

प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने बांधलेल्या हायवेच्या गटारांची अक्षरशः बेकार परिस्थिती असून त्याचा वापरही होत नाही. नियोजन नसल्याने सर्व्हिस रस्त्यावरील पाणी गटारातून न वाहता चक्क सर्व्हिस रस्त्यावरूनच वाहत आहे. याला जबाबदार कोण ? हायवे प्राधिकरण चे अधिकारी आता तरी जागे होऊन कणकवली शहरात हायवे संदर्भात वारंवार उद्भवणाऱ्या समस्या दूर करतील का ? असे प्रश्न उपस्थित होत आहे.