मधमाशांचा हल्ला दशक्रिया विधी वेळची घटना | सात जण जखमी

183

देवगड : तालुक्यातील गढीताम्हाणे पुलाखाली खाडी किनारी झोरे कुटुंबीय आपल्या आईचा दशक्रिया विधी करीत अचानक पुलाच्या खाली असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांमधील मधमाशांनी उठून दशक्रिया विधी सुरू असलेल्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांवर हल्ला केला. मधमाशांच्या अचानक हल्ला केल्याने उपस्थित असलेल्या झोरे कुटुंबातील सदस्य व त्यांच्या समवेत असलेल्या लोकांनी सैरावैरा पळ काढला. मात्र मधमाशांच्या हल्लात सहा ते सात जण जखमी झाले. त्यांच्यावर तळेबाजार येथे खाजगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार राहटेश्वर दादरा कुंभार येथील पांडुरंग झोरे यांची आई कोयनाबाई जानू झोरे यांचा सोमवारी सकाळी दशक्रिया विधी होता. या निमित्त झोरे कुटुंबातील सदस्य पांडुरंग झोरे, आप्पा झोरे, बबन झोरे, तुकाराम झोरे, बबन कोकरे, सुरेश सखाराम कोकरे, बबन रघुनाथ कोकरे,आदि झोरे व कोकरे कुटुबिय, न्हावी प्रमोद यादव आणि ग्रामस्थ हे सकाळी साडेनऊच्या सुमारास दशक्रिया विधीसाठी गढीताम्हाणे पुलाच्या खाली किनारी उपस्थित होते दशक्रिया विधी सुरू असताना साडेदहा सुमारास पुलाच्या खालील बाजूला असलेल्या पोळ्यांमधून मधमाशा बाहेर पडल्या व त्यांनी थेट दशक्रिया विधी सुरू असलेल्या ठिकाणी लोकांवर हल्ला केला.अचानक हल्ल्याने सर्वजण सैरावैरा धावू लागले. या हल्ल्यात सात जण जखमी आले असून त्यांना तळेबाजार येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. पुलाखाली असलेल्या मधमाशांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी पत्राद्वारे ग्रामपंचायतीमार्फत वन विभागाकडे करण्यात आली आहे.