वैभववाडी : दिव्यांग तरुणीचा विनयभंग केल्याची घटना हेत येथे घडली आहे. आरोपी संतोष हरी खानविलकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार दि. २९ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली होती.
पीडित तरुणीचे वडील मोलमजूरीसाठी गेले होते. तर आई नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती. त्यामुळे पीडित दिव्यांग तरुणी एकटीच घरी होती. याच दरम्यान ग्रामपंचायत कर्मचारी खानविलकर हा ग्रामपंचायतीची पत्रके घेऊन पीडित तरुणीच्या घरी गेला. घरात कोणीच नसल्याची संधी साधून त्याने तरुणीशी लगट केली. तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने जोरजोरात रडण्यास सुरुवात केली. त्यामुळे खानविलकर तेथून पसार झाला.
लग्नाला गेलेली आई घरी आल्यानंतर तरुणीने घडलेला प्रकार आईला सांगितला. घडलेला प्रकार आईने स्थानिक ग्रामस्थांना सांगितला. त्यामुळे काही ग्रामस्थांनी प्रकरण स्थानिक पातळीवर मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.
पीडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार संतोष खानविलकर याच्यावर विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील करित आहेत.





