माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तुरुंगवास झालाच पाहिजे : आ. नितीन देशमुख

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. न्यायालयाने आपल्या निकालातून शिंदे गट आणि राज्यपालांच्या विविध कृत्यांवर ताशेरे ओढले. राज्यपालांनी अनेक प्रकारची चुकीची आणि बेकायदेशीर कृत्यं केली, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. न्यायालयाने राज्यपालांची कृती बेकायदेशीर असल्याचं सांगितलं असलं तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठी मागणी केली आहे.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तुरुंगवास झालाच पाहिजे, अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली. चुकीचं आणि बेकायदेशीर कृत्यं करुनही माजी राज्यपालांवर जर कारवाई झाली नाही, तर भविष्यात देशातील इतर राज्यपाल केंद्राच्या दबावाला बळी पडून असेच कृत्य करतील. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुन्हा ताशेरे मारतील. पण हे थांबवायचं असेल तर माजी राज्यपालांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली. ते ‘मुंबई तक’शी बोलत होते.