जमिनीचा वाद ; दोघांमध्ये हाणामारी | पाच जणांविरूध्द पोलिसात गुन्हे दाखल.!

96

देवगड : जमीनजागेच्या वादातून तोरसोळे धनगरवाडी येथे चक्क पाणी घेवून जात असलेल्या टेम्पोवर हल्ला करून टेम्पोतील दिपक विठ्ठल वरक व आयेशा अनिल वरक या दोघांना खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी तोरसोळे धनगरवाडी येथील पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा.सुमारास तोरसोळे धनगरवाडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तोरसोळे धनगरवाडी येथी दिपक विठ्ठल वरक आणि गंगाराम धाकू वरक या कुटूंबियांमध्ये घर व जमीन जागेवरून वाद असून न्यायालयात खटला सुरू आहे.२१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा.सुमारास दिपक वरक(२८) हे त्यांच्या चुलत बहिणीकडे कार्यक्रम असल्याने त्यांचा टेम्पो घेवून कार्यक्रमासाठा लागणारे पाणी आणण्यासाठी जात होते.त्यावेळी त्यांच्यासमवेत आयेशा अनिल वरक टेम्पोमध्ये होत्या.पाणी आणण्यास जात असताना गंगाराम धाकू वरक, गीता गंगाराम वरक, मंगेश सिताराम वरक, मनाली मंगेश वरक व सिताराम जानू वरक या पाचजणांनी दिपक यांच्या टेम्पोवर धाव घेवून टेम्पोतील दिपक वरक व आयेशा वरक या दोघांना खाली ओढून काढून लाथाबुक्कयांनी मारहाण केली.याबाबत दिपक वरक यांनी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गंगाराम वरक यांच्यासहीत पाचजणांविरूध्द भादवि १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६,३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस नाईक मिलींद परब करीत आहेत